परदेशी महिलेचा विनयभंग करून अश्लील आशय प्रसारित केल्याचा ठपका; गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचची कारवाई

पणजी: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवरील टिटोज लेन परिसरात एका परदेशी महिलेशी संबंधित अश्लील आशय असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी गोवा क्राईम ब्रँचने उत्तर प्रदेशातील लखनौ येथून सौरभ सहानी (४८) या संशयिताला अटक केली आहे. स्वतःच्या युट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी संबंधित महिलेबाबत व्हिडिओ अपलोड केल्याची कबुली संशयिताने दिली असून, या प्रकरणाने गोव्यात येणारे पर्यटकांची पर्सनल स्पेस आणि पर्यटनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये काही अज्ञात तरुण बागा येथील टिटोज लेनजवळ एका परदेशी महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग करताना दिसत होते. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत गोवा पोलिसांनी स्वेच्छा दखल घेऊन गुन्हा नोंदवला होता. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७५ आणि ७९, तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६७ आणि ६७-ए अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंग, अश्लील वर्तन आणि अश्लील आशय असलेला मजकूर प्रसारित करणे असे गंभीर आरोप या प्रकरणातील संशयितांवर ठेवण्यात आले आहेत.
पणजी येथील सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने या व्हिडिओचा तांत्रिक तपास केला असता, हा व्हिडिओ 'Realduniya007' या युट्यूब चॅनेलवर आणि 'सौरभ सहानी' नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर अपलोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताचे लोकेशन लखनौ असल्याचे स्पष्ट होताच, क्राईम ब्रँचचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. तेथून सौरभ सहानीला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले आणि रीतसर अटक करण्यात आली. त्याचा चॅनल सध्या पोलिसांच्या सूचनेवरून युट्यूबने हटवला आहे.

चौकशीदरम्यान सौरभ सहानीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, १९ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे १:१९ च्या सुमारास त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. सुरुवातीला हा व्हिडिओ त्याने आपल्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवला होता. मात्र, आपल्या युट्यूब चॅनेलची लोकप्रियता आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी त्याने १२ एप्रिल २०२६ रोजी हा व्हिडिओ सार्वजनिक केला. विशेष म्हणजे, व्हिडिओ अपलोड करताना त्याने पीडित महिलेचा चेहरा धूसर (Blur) केला नव्हता, ज्यामुळे तिची ओळख उघड झाली. युट्यूबवर कमी व्ह्यूज मिळाल्याने त्याने अधिक प्रसिद्धीसाठी हाच व्हिडिओ आपल्या वैयक्तिक फेसबुक अकाउंटवरही पोस्ट केला.

क्राईम ब्रँचने या प्रकरणातील पीडित परदेशी महिलेचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर सह-संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तपासचक्र वेगाने फिरत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक (क्राईम) राहुल गुप्ता (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक जीवबा दळवी, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर आणि उपनिरीक्षक अमीन नाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गोव्याच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध पोलीस कठोर पावले उचलत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.