धोंडगणांवर शोककळा.

डिचोली: शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, डिचोली तालुक्यातील वाठादेव-सर्वण येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सोवळे व्रत पाळणाऱ्या दामोदर उर्फ अभिषेक दलपत नाईक (२३, रा. काजीवाडा, विठ्ठलापूर-साखळी) या धोंडगणाचा गुरुवारी सकाळी पाणवठ्यावर अंघोळ करताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोवळे व्रत धारण केलेला अभिषेक सकाळी आंघोळीसाठी पाणवठ्यावर गेला होता. तो स्नान केल्यानंतर पाण्याबाहेर आला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा पाण्यात गेला. यावेळी सर्व ज्येष्ठ धोंडगण देवळाच्या शेडमध्ये बसले होते. तर, काहीजण पाण्यात स्नान करीत होते. अभिषेक पाण्यात असताना अचानक त्याला फिट आली, यामुळे तो पाण्यात कोसळला. सुमारे पंधरा मिनिटांनंतर तो पाण्याबाहेर आला नसल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
शिरगावची जत्रा काही दिवसांवर असताना आणि सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना घडलेल्या या घटनेमुळे साखळी आणि डिचोली परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. अभिषेकच्या पश्चात त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार असून, या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी अपडेट होत आहे.