लईराई जत्रोत्सवासाठी धाेंडांचे आजपासून ५ दिवसांचे व्रत

हजारो धोंड व्रतस्थ : जत्रोत्सवाच्या तयारीला वेग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27 mins ago
लईराई जत्रोत्सवासाठी धाेंडांचे आजपासून ५ दिवसांचे व्रत

डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या २१ रोजीच्या उत्सवानिमित्त (Annual Jatra of Shree Lairai Devi at Shirgao) गोवा तसेच इतर राज्यांतील हजारो धोंड शुक्रवारपासून व्रताला प्रारंभ करत आहेत. आगामी पाच दिवस संपूर्ण गोव्यात या सोवळ्याचे दर्शन घडणार आहे. जत्रेच्या पार्श्वभूमीवर शिरगावात तयारीला वेग आला असून विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू आहे.
गावागावांतील नैसर्गिक जलस्रोत, विहिरी आणि मंदिर परिसरात मोठ्या संख्येने व्रतस्थ धोंड एकत्र राहून पाच दिवस वेगळी अनुभूती घेणार आहेत. आपल्या घरापासून पाच दिवस वेगळे राहून आणि गटागटाने एकत्र राहून देवाची भक्ती करणे, हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे, असे विक्रम आरोलकर या धोंडाने सांगितले.
या जत्रोत्सवामुळे फराळ, भाजीपाला, कपडे, भांडी तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष पसंती दिली जात असल्याने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होते. जत्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन तसेच देवस्थान समितीने तयारीला गती दिली असून वेगवेगळ्या पातळीवर कामांची घाई सुरू असल्याचे चित्र गुरुवारी शिरगावात दिसून आले. तळीच्या ठिकाणी हजारो धोंड स्नान करणार असल्याने त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ९२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग आणि इतर व्यवस्थेवर वाहतूक पोलीस नजर ठेवून आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन
गेल्या वर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने यावर्षी कडक भूमिका घेतली आहे. यंदा जत्रेत फेरी भरवण्यास परवानगी नाकारण्यात आली असून मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीने केला आहे.

प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आणि कौलोत्सवासाठी यावे, मात्र शिस्तीचे पालन करून देवस्थान समितीला सहकार्य करावे.
- दीनानाथ गावकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष      

हेही वाचा