गरिबांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करत राहणार !

डॉ. रघुनाथ माशेलकर : २०३५ च्या समृद्ध गोव्याचे मांडले व्हिजन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24 mins ago
गरिबांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करत राहणार !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘गोमंत गौरव’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. रघुनाथ माशेलकर. सोबत मंत्री मॉविन गुदिन्हो, डॉ. राहुल कराड व इतर.

पणजी : मी गरीब, सामान्य जनतेसाठी काम करावे, हा माझ्या आईचा सदैव आग्रह होता. तिच्या नावे सुरू करण्यात आलेल्या अंजनी फाउंडेशतर्फे आजही आम्ही विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर गरीब कल्याणासाठी करत असल्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. जीसीसीआय आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मॉविन गुदिन्हो, डॉ. राहुल कराड, प्रतिमा धोंड उपस्थित होते. तत्पूर्वी डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत गौरव’ सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. माशेलकर म्हणाले की, बालपण अत्यंत गरिबीत गेले. आई शाळेत गेली नव्हती, पण मी शिकावे यासाठी तिचा सदैव आग्रह होता. पीएच.डी. झाल्यावरही तिने मला अधिक शिकण्यास प्रोत्साहित केले. ‘आपली सुरुवात कुठून झाली, हे कधीही विसरू नका’, ही तिने दिलेली शिकवण मी आयुष्यभर जपली आहे. आईच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘अंजनी फाउंडेशन’च्या माध्यमातून आज आम्ही भविष्यातील गरजा ओळखून कल्पक उपकरणे आणि सेवा विकसित करत आहोत.ते म्हणाले, आईचे निधन झाल्यानंतर आम्ही सामान्य लोकांसाठी अंजनी फाउंडेशन सुरू केले. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाज उपयोगी उपकरणे, सेवा, वस्तू तयार करण्यावर आमचा भर आहे. दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा भविष्यात उपयोगी पडेल असे कल्पक उपक्रम आम्ही करत आहोत. गोमंत गौरव सन्मानाने पुरस्कृत होणे ही अभिमानाची गोष्ट. हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो. लोकांच्या सदिच्छा हेच आमचे भांडवल आहे. याबाबतीत आम्ही श्रीमंत आहोत. २०३५ मधील गोवा सूरमयी, सुसंकृत, संतुलित, सुविद्य, समृद्ध, सुशासन आणि स्वानंदी असेल असे स्वप्न आम्ही पाहिले आहे.
१०० रुपयांत १० वैद्यकीय चाचण्या : मुख्यमंत्री
या कार्यक्रमात उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. माशेलकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, डॉ. माशेलकर यांना हा पुरस्कार मिळणे ही संपूर्ण गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या अंजनी फाऊंडेशनने तयार केलेली वैद्यकीय चाचणी स्ट्रिप लवकरच राज्यात उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये १०० रुपयांत १० प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या १० मिनिटात होणार आहेत. राज्यात वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे काम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.