शिवरायांच्या पुतळ्यासाठी वास्कोतील शिवप्रेमींकडून सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ

सडा येथील शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई लांबणीवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
43 mins ago
शिवरायांच्या पुतळ्यासाठी वास्कोतील शिवप्रेमींकडून सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ

सडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झालेले शिवप्रेमी.

वास्को : सडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असूनही, मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) आणि जिल्हा प्रशासनाने १६ एप्रिल रोजीची प्रस्तावित कारवाई सध्या पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवप्रेमींनी एकत्र येत पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यासाठी व्यापक सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.
पुतळा हटवण्याच्या नियोजित कारवाईपूर्वी १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. पुतळा हटवताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सशस्त्र पोलीस दलाची मोठी कुमक आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई तुर्तास पुढे ढकलण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला.
१६ एप्रिल रोजी पुतळा हटवला जाणार असल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावर शिवप्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, कारवाई पुढे ढकलल्याचे कळताच गर्दी कमी झाली. तरीही, काही शिवप्रेमींनी सडा चौकात पुतळ्यासमोर एकत्र येऊन सह्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, गोळा केलेल्या सह्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतळा न हलवण्याबाबतचे निवेदन पाठवण्यात येणार आहे.
सदर पुतळा तेथून हलवू नये या मागणीला वास्को आणि सडा परिसरातील नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत केंद्र सरकार किंवा प्राधिकरण यावर ठोस तोडगा काढत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.
नेमका वाद काय?
१९ फेब्रुवारी रोजी सडा येथील चौकाजवळच्या एका विनावापर जमिनीवर हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, मुरगाव बंदर प्राधिकरणाने या जागेवर हक्क सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुतळा हटवण्याचे आदेश दिले असले तरी, शिवप्रेमींनी एमपीएने भावनांचा विचार करून मोठ्या मनाने ही जागा पुतळ्यासाठी द्यावी, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा