इमारत सील करून उलटला वर्षभराचा काळ; येथील व्यवसाय आधीच झालेत ठप्प, आता आजू बाजूचे छोटे व्यापारीही चिंतेत.

पणजी: पणजीच्या मुख्य मार्केट परिसरात गेल्या वर्षभरापासून सील केलेली एक धोकादायक इमारत पाडण्याची तयारी 'पणजी महानगरपालिकेने' (CCP) सुरू केली आहे. मात्र, या कारवाईमुळे स्थानिक छोटे व्यापारी आणि स्टॉलधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आपल्या उपजीविकेवर गदा येईल, या भीतीने व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे स्पष्ट पुनर्वसन आराखड्याची मागणी केली आहे.

मुळात, महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून गेल्या एक वर्षापासून ती सील केली होती. या कालावधीत इमारतीच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या अनेक दुकानदारांचे व्यवसाय आधीच बंद झाले आहेत. आता ही इमारत प्रत्यक्ष पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र, केवळ इमारतच नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेले स्टॉल आणि गाडेदेखील हटवले जातील, अशी अफवा विक्रेत्यांच्या कानावर पडल्याने गोंधळ वाढला आहे.

अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आहे. आमचे स्टॉल हटवण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा किंवा कोणत्याही प्रकारचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय किंवा पुनर्वसन योजनेशिवाय जर ही कारवाई झाली, तर आमच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होईल, असा दावा पीडित विक्रेत्यांनी केला आहे.

प्रभावित व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे मागणी केली होती की, पाडकाम सुरू करण्यापूर्वी त्यांचे स्थलांतर करावे किंवा एक ठोस पुनर्वसन आराखडा समोर ठेवावा. पण आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या कारवाईमुळे पणजी मार्केटच्या व्यावसायिक गजबजाटावरही परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.