
पणजी : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) वरचावाडा-हरमल (Harmal) परिसरात बिबट्याच्या (Leopard) संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी उशिरा रात्री एका घराच्या व्हरांड्यातून बिबट्याने कुत्र्याला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली.
ही संपूर्ण घटना घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTv Camera) कैद झाली आहे. त्यात बिबट्या शांतपणे येऊन कुत्र्याला पळवून नेताना स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. लहान मुले व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि बाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.