पीडितेची उलटतपासणी होईपर्यंत संशयिताला जामीन देणे शक्य नाही!

सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 11:42 pm
पीडितेची उलटतपासणी होईपर्यंत संशयिताला जामीन देणे शक्य नाही!

पणजी : सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेच्या तक्रारीतील घटनाक्रमाला तसेच न्यायदंडाधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबाबाला दुजोरा मिळत असल्याने, तिची न्यायालयीन उलटतपासणी होईपर्यंत आरोपींना जामिनावर सोडता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत पणजी जलदगती न्यायालयाने दोघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणातील संशयित रोवन आब्रान्चेस (२१, वेर्णा) आणि मेक्वीन आद्राद (२५, नुवे) यांच्याविरोधात आगशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ मार्च रोजी ती बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर गेली असताना सायंकाळी सुमारे ३.३० वाजता दोघा युवकांनी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी तिला मद्यपान करण्यास प्रवृत्त केले. नशा चढल्यानंतर तिला आगशी येथील नवीन जुवारी पुलाखालील नदीकाठावर नेऊन तिच्यावर बळजबरीने सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रक्षा नाईक यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडितेने दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी दारू खरेदीसाठी यूपीआयद्वारे पैसे दिल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संबंधित दुकानात चौकशी करण्यात आली. या तपासातून मिळालेल्या यूपीआय व्यवहाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोवन आब्रान्चेस याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून दुसरा संशयित मेक्वीन आद्राद याची माहिती मिळाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान, दोन्ही संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता सिंडायाना सिल्वा यांनी पीडितेचा न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नोंदवलेला जबाब लक्षात घेता जामीन नाकारावा, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आणि पुराव्यांची सुसंगती लक्षात घेऊन दोन्ही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.          

हेही वाचा