आग्वाद तुरुंगातील संग्रहालयात गोमंतकीयांना यापुढे सशुल्क प्रवेश

ओळखपत्र दाखविल्यास पर्यटकांपेक्षा आकारणार कमी​ शुल्क

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 11:27 pm
आग्वाद तुरुंगातील संग्रहालयात गोमंतकीयांना यापुढे सशुल्क प्रवेश

पणजी : सरकारी मालमत्ता असलेल्या आग्वाद कारागृहाचे आता पूर्णपणे खासगीकरण झाले असून, येथे गोमंतकीयांना मिळणारा मोफत प्रवेश बंद करण्यात आला आहे. संग्रहालयात रूपांतरित करण्यात आलेल्या या कारागृहात यापूर्वी गोमंतकीयांना मोफत प्रवेश दिला जात होता, मात्र आता ही वास्तू चालवणाऱ्या खासगी कंपनीने नियमात बदल करून स्थानिकांकडून शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे.
सिकेरी-कांदोळी येथील या ऐतिहासिक आग्वाद किल्ल्यातील कारागृहाचे पर्यटन खात्याने पीपीपी तत्त्वावर सुशोभीकरण करून त्याचे ‘वारसा आणि सांस्कृतिक केंद्रात’ रूपांतर केले आहे. २०१५ मध्ये हे कारागृह बंद झाल्यानंतर, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेखाली याचा विकास करून गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास जतन करण्यात आला. सध्या ही वास्तू ‘वॉटरफ्रंट एक्सपिरियन्स प्रा. लि.’ ही खासगी कंपनी चालवत असून, वार्षिक १.५० कोटी रुपये शुल्कासह ३० वर्षांच्या लीजवर हा प्रकल्प या कंपनीला देण्यात आला आहे.
गोव्याच्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राहावी आणि स्थानिकांना आपल्या वारशाचा अनुभव घेता यावा, यासाठी पर्यटन खात्याने गोमंतकीयांना प्रवेश मोफत ठेवण्याचे ठरवले होते. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून ओळखपत्र दाखवल्यावर स्थानिकांना मोफत प्रवेश मिळत होता. मात्र, आता कंपनीने हा मोफत प्रवेश अचानक बंद केला आहे.
नवीन नियमांनुसार, आता ओळखपत्र दाखवणाऱ्या गोमंतकीयांना पुढीलप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे. यामध्ये प्रौढ व्यक्तींना १५० रुपये, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना ७५ रुपये आकारण्यात येणार असून भारतीय सैन्य दल, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रवेश अजूनही मोफत आहे.
दरम्यान, या संदर्भात पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना या नवीन बदलाची कोणतीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे.
पर्यटकांच्या शुल्कातही वाढ
देशी आणि विदेशी पर्यटकांना गोमंतकीयांच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट शुल्क मोजावे लागत आहे. देशी पर्यटकांमध्ये प्रौढांना ३०० रुपये, तर मुले व ज्येष्ठांसाठी १५० रुपये शुल्क आकारले जात आहे. तर परदेशी पर्यटकांमध्ये प्रौढांसाठी ६०० रुपये, तर मुलांसाठी ३०० रुपये शुल्क आकारले जात आहे.

हेही वाचा