म्हापशातही दुचाकीच्या स्वयंअपघातात एकाने गमावले प्राण

म्हापसा : पर्वरी येथील 'एससीईआरटी' इमारतीजवळ आज सोमवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. बंद असलेल्या महामार्गावरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमुळे हा अपघात घडला. पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, पर्वरी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने 'मॉल द गोवा'पासून पुढे जाणारा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ८:३० च्या सुमारास संशयित चालक उमेश रामचंद्र साहा हा पर्यटन खात्याच्या कामासाठी वापरला जाणारा ट्रक घेऊन या बंद रस्त्यावरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला. यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या सशीभूसन कुमार (४५, रा. बिहार) या कामगाराला ट्रकने प्रथम धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून रस्ता ओलांडणाऱ्या कृष्णनंदन चंद्रा देव (४०, रा. उत्तराखंड) याला जोरदार धडक देऊन सुमारे ४० मीटरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात कृष्णनंदन यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला उपस्थित जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी शशीभूषण याच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पर्वरी पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत, म्हापसा येथील समतानगर भागात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या दुचाकीच्या स्वयंअपघातात सत्यवान संजीव मोरे (३८, रा. खोर्ली) यांचा मृत्यू झाला आहे. सत्यवान आपल्या दुचाकीवरून जात असताना उतारावर त्यांचा ताबा सुटल्याने ते रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना म्हापसा जिल्हा रुग्णालयातून गोमेकॉत हलवण्यात आले होते, मात्र सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. म्हापसा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.