नेसाय येथे बेकायदेशीर एजन्सीतून दोन लाखांचे एक्स्पायर्ड चॉकलेट व इतर खाद्यपदार्थ जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th April, 04:56 pm
नेसाय येथे बेकायदेशीर एजन्सीतून दोन लाखांचे एक्स्पायर्ड चॉकलेट व इतर खाद्यपदार्थ जप्त

मडगाव: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मडगाव विभागाच्या पथकाने नेसाय येथील औद्योगिक वसाहतीतील 'महेश मार्केट'च्या वितरण केंद्रावर छापा टाकून चॉकलेटसह दोन लाखांचे कालबाह्य खाद्यपदार्थ जप्त केले. या एजन्सीकडे कोणताही अधिकृत परवाना नसून, संबंधित एजन्सीधारकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सां जुजे दी आरियाल येथील औद्योगिक वसाहतीतील या वितरण केंद्रातून कालबाह्य खाद्यपदार्थ वितरित केले जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. यापूर्वी एका दुचाकीचालकाला असाच कालबाह्य माल नेताना पथकाने पकडले होते. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून नेसाय येथील महेश मार्केट वितरण केंद्राचा पत्ता समोर आला. ही कारवाई मडगाव अन्न व औषध खात्याचे अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासणी दरम्यान अनेक खाद्यपदार्थ कालबाह्य (एक्स्पायर्ड) झाल्याचे आणि त्यांची साठवणूक अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत केल्याचे आढळले. अनेक बॉक्स उंदरांनी कुरतडलेले होते. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या आवडीच्या चॉकलेट्सचा समावेश होता, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकले असते. व्यवसाय परवाना नसतानाही हा अनधिकृत व्यापार सुरू होता. पथकाने दोन लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला असून, संज्योत कुडाळकर यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा दिला आहे. तसेच ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना 'एक्स्पायरी डेट' तपासून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 


हेही वाचा