परिसराला गलिच्छ स्वरूप : वाळवंटी नदीत पर्यटकांना बंदी घालण्याची मागणी

फोटो : ‘उभो गुणो’ डोह परिसरात पर्यटकांकडून टाकण्यात आलेला कचरा.
...
वार्ताहर। गोवन वार्ता
केरी-सत्तरी : मोर्ले येथील वाळवंटी नदीकिनारी असलेल्या ‘उभो गुणो’ डोहात स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता पर्यटकांकडून आंघोळ व दंगामस्ती सुरूच असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना येथे येण्यास व आंघोळीला बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे.
पेळावदा-मोर्ले परिसरातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या डोहात उन्हाळ्यात गोव्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेकजण नदीत आंघोळ करून, अन्नपदार्थ घेऊन येऊन नदीकिनारीच चुली पेटवून जेवण करतात. त्यानंतर प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर कचरा तसाच टाकून जात असल्याने परिसर अस्वच्छ होत असून दुर्गंधी पसरत आहे. याशिवाय काही पर्यटक दारूच्या नशेत मोठ्या आवाजात संगीत लावून दंगामस्ती करतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शांततेत सहल करणारे इतर पर्यटकही त्रस्त होत आहेत. काचेच्या बाटल्या फोडल्यामुळे परिसर धोकादायक बनला आहे.
डोहात आंघोळ करताना अपघात होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून पोहता न येणे, खोल पाण्याचा अंदाज न येणे व दारूच्या नशेत पाण्यात उतरणे ही मुख्य कारणे असल्याचे समोर आले आहे. मोर्लेतील उभो गुणो, मधले तळप व करकार या डोहांमध्ये पर्यटकांकडून वाढत्या गैरप्रकारांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक तरुणांकडून पर्यटकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही.

पंचायतीने लावलेला सूचना फलक.
...
नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न
पर्यटकांकडून टाकण्यात येणारा कचरा, टाकाऊ अन्नपदार्थ व दारूच्या बाटल्यांमुळे वाळवंटी नदीचे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी पुढे साखळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पावसाळ्यात हा कचरा नदीत वाहून जाऊन प्रदूषणात आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
..
पंचायतीचा कारवाईचा इशारा
मोर्ले ग्रामपंचायतीने नदीकिनारी ‘आंघोळीला बंदी’ दर्शविणारे फलक लावले असूनही पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरपंच अमित शिरोडकर यांनी सांगितले की, नदीकिनारी आंघोळीवर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.