सम्राट चौधरी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री

जेडीयूचे विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव बनले उपमुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सम्राट चौधरी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री

पाटणा : बिहारच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून, भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असूनही आजवर भाजपला बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवता आले नव्हते. मात्र, आज सम्राट चौधरी यांच्या रूपाने भाजपने हा दुष्काळ संपवला असून राज्यात पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे.

सम्राट चौधरी यांची कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी राहिली आहे. संघाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या आक्रमक वक्तृत्वशैली आणि संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी नऊ वर्षांच्या कालावधीत प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली आहे. या मंत्रिमंडळात सत्तेचे संतुलन राखण्यासाठी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) दोन दिग्गज नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. जेडीयूचे विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, यामुळे एनडीएची युती अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

या भव्य शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन नवीन, चिराग पासवान यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सम्राट चौधरी यांच्या निवडीमुळे बिहारमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत राज्यसभेची वाट धरल्यानंतर आता बिहारची कमान पूर्णपणे भाजपच्या हाती आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सम्राट चौधरी यांची 'इनिंग' बिहारच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा