काजूर गोळीबार प्रकरण: बंदुकीच्या मालकीबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th April, 12:17 pm
काजूर गोळीबार प्रकरण: बंदुकीच्या मालकीबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू

पणजी: सांगे तालुक्यातील कावरे-पिर्ला पंचायत क्षेत्रांतर्गत येणाऱ्या काजूर येथे मित्रांच्या पार्टीदरम्यान घडलेल्या एका अघटित घटनेत २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. थट्टा-मस्करीच्या ओघात रायफलमधून झाडलेली गोळी थेट मानेला लागल्याने तन्वी घाडी या तरुणीला आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील मुख्य संशयित श्वेत गावडे (रा. पाळी) याला केपे पोलिसांनी अटक केली असून, केपे प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवारी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून शस्त्रांच्या बेफिकीर हाताळणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त केली असून, ती कोणाच्या नावावर होती आणि तिचा स्त्रोत काय, याचा शोध आता घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १२ एप्रिल रोजी काजूर येथील एका घरात पाच मित्रांचा गट पार्टीसाठी जमला होता. तन्वी घाडी ती देखील आपल्या मित्रांसोबत या पार्टीत सहभागी झाली होती. पार्टी सुरू असतानाच तिथे एक एअर रायफल आणण्यात आली. संशयित श्वेत गावडे याने केवळ गंमत म्हणून तन्वीच्या दिशेने रायफल रोखली आणि "गोळी झाडू का?" असे मस्करीत विचारत ट्रिगर ओढला. ती रायफल 'लोड' केलेली होती आणि त्यातून सुटलेली गोळी थेट तन्वीच्या मानेच्या डाव्या बाजूला लागली. गोळी लागताच प्रचंड रक्तस्राव झाल्याने तन्वीचा जागीच मृत्यू झाला. 

केपे पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत संशयित श्वेत गावडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रायफल ज्याच्या घरात पार्टी सुरू होती, त्यांच्या सासऱ्यांची असून ती शेतातील पाखरे हुसकावण्यासाठी वापरली जात होती. मात्र, हे शस्त्र वैध परवानाधारक होते की बेकायदेशीर, यादृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) आणि शस्त्र कायद्याच्या (Arms Act) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात अवैध शस्त्र बाळगणे आणि त्याच्या वापरामुळे मृत्यू ओढवणे यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे.

तन्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, अतिरक्तस्राव हेच मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आता या शस्त्राचा मूळ स्त्रोत काय होता याचा सखोल शोध घेत आहेत.


हेही वाचा