नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावरून पायउतार; बिहारमध्ये पहिल्यांदाच होणार भाजपचा मुख्यमंत्री; आज शपथविधी

पाटणा: बिहारच्या राजकीय क्षितिजावर मंगळवारी एक ऐतिहासिक बदल झाला. दहा वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नितीश कुमार आपल्या पदावरून पायउतार झाले. आता भाजप राज्याची धुरा सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपचा स्वतःचा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणातील 'नितीश युगा'चा प्रभाव काहीसा ओसरून भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. सम्राट चौधरी आज, १५ एप्रिल रोजी एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावशाली राहिली आहे. मुंगेरमधील एका दिग्गज राजकीय कुटुंबात जन्मलेल्या चौधरींना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे सात वेळा आमदार आणि समता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. सम्राट चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून केली होती आणि वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी विविध सरकारांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली आणि २०१८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधील त्यांचा प्रवास अत्यंत वेगवान राहिला/ काही काळातच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
![]()
चौधरी यांच्या मुख्यमंत्रीपदाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'भगवी पगडी'. २०२२ साली भाजपला टांग देऊन नितीश जेव्हा आरजेडीसोबत गेले तेव्हा नितीश कुमार यांनाच सत्तेतून खाली खेचण्याचा संकल्प करून त्यांनी ही पगडी परिधान केली होती. मात्र, जुलै २०२४ मध्ये अयोध्या येथे शरयू नदीत स्नान करून आणि प्रभू रामाच्या चरणी ती पगडी अर्पण करून त्यांनी आपला संकल्प पूर्ण झाल्याचे जाहीर केले. एक लढाऊ नेता ते आता राज्याचे नेतृत्व करणारा प्रशासक असा त्यांचा हा प्रवास 'पगडी ते मुकुट' या स्वरूपात पाहिला जात आहे. ओबीसी (कुशवाहा) समाजातील त्यांचे नेतृत्व भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये अत्यंत निर्णायक ठरू शकते.
बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. बेरोजगारी, स्थलांतर आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देणे यांसारख्या जुन्या समस्या सोडवण्यासोबतच, एनडीए मधील मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य त्यांना दाखवावे लागेल. नितीश कुमार आता राज्यसभेत गेल्यानंतर, बिहारमध्ये भाजपचा 'सॅफ्रन रिव्होल्युशन'चा संकल्प सम्राट चौधरी कसा पूर्ण करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
