
अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात तब्बल १८० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज ऊर्फ तनवीर नावाच्या संशयिताला अटक केली असून, त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेला संशयित मोहम्मद अयाज हा अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने या मुलींना लग्नाचे किंवा इतर आमिषे दाखवून मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नेले. तिथे या मुलींवर अत्याचार करण्यात आले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले. आरोपीकडे अशा स्वरूपाचे ३५० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आले आहे.
केवळ शारीरिक शोषण करून तो थांबला नाही, तर या व्हिडिओंआधारे तो मुलींना ब्लॅकमेल करत असे. या भयापोटी अनेक मुलींना त्याने वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याचाही गंभीर आरोप आहे. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा (व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅट) अत्यंत पद्धतशीरपणे वापर केला होता.
या प्रकरणाचा उलगडा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तक्रार केल्यानंतर झाला. बोंडे यांनी या प्रकरणाची व्याप्ती पाहता तातडीने विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. हा केवळ गुन्हा नसून एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा भाग आहे, असे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.
दुसरीकडे, संशयित मोहम्मद अयाज हा एआयएमआयएम पक्षाचा माजी पदाधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पक्षाच्या रॅलींमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, पाप उघडकीस येताच त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट रिकामे करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे स्थानिक मुस्लीम समाजातही संतापाची लाट आहे. समाजातील प्रतिष्ठीत नागरिक आणि तरुणांनी स्वतः पोलीस ठाण्यात धाव घेत, अशा विकृत प्रवृत्तींमुळे संपूर्ण समाजाची नाहक बदनामी होते, त्यामुळे आरोपीला कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन जप्त केला असून सायबर सेलच्या मदतीने डेटा रिकव्हर केला जात आहे. हे अश्लील व्हिडिओ त्याने कोणाला पाठवले होते का? किंवा या मागे एखादी मोठी रॅकेट कार्यरत आहे का? या दिशेने पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत सखोल तपास सुरू आहे.