संशयित विंदा वेळीप यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; सोसायटीचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका

पणजी : सांगे तालुक्यातील एका सोसायटीमध्ये दूध संकलन आणि पशुखाद्य विक्रीच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता व विश्वासाचा घात केल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी एका महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. संशयित विंदा वेळीप यांनी कर्तव्यात कसूर करून सुमारे १,६२,९१२ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, या तक्रारीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देवानंद वेळीप यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात संशयित विंदा वेळीप यांच्याकडे दूध संकलन, पशुखाद्याची विक्री आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक नोंदी ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, संशयिताने या नोंदींमध्ये मोठी तफावत ठेवल्याचे ऑडिट दरम्यान समोर आले. पशुखाद्याचा साठा आणि त्याचे हिशोब यात गंभीर विसंगती आढळून आली असून, संशयिताने या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
तपासादरम्यान असेही निदर्शनास आले की, कामधेनु ॲग्रोवेट आणि गोवा बागायतदार यांसारख्या पुरवठादारांकडून पशुखाद्याचा साठा मागवण्यासाठी संशयिताने मागणीपत्रे सादर केली होती. या मागणीपत्रांच्या आधारे सोसायटीकडून संबंधित पुरवठादारांना पैसेही अदा करण्यात आले. मात्र, त्या बदल्यात मिळणारा साठा एकतर पूर्णपणे मिळाला नाही किंवा मिळालेल्या साठ्याची कोणतीही अधिकृत नोंद किंवा डिलिव्हरी चलान संशयिताने सादर केले नाही. यामुळे सोसायटीचे १.६२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सांगे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रद्युम्न केणी या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून, आर्थिक व्यवहारांची सर्व कागदपत्रे पडताळली जात आहेत.