आमदार संकल्प आमोणकरांचे एमपीए प्रशासनाला आवाहन

पणजी : सडा जंक्शन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव पोर्ट अथॉरिटी (MPA) आणि शिवप्रेमींना शांतता राखण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, कोणीही कायदा हातात घेऊ नका, मात्र प्रशासनानेही आकस न धरता सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.
व्हिडिओमध्ये आमदार आमोणकर यांनी सांगितले की, ज्या जागेवर महाराजांचा पुतळा उभा आहे, तो भाग पूर्वी कचऱ्याचा डेपो (Garbage Dump) होता. शिवप्रेमींनी स्वखर्चाने आणि मेहनतीने ही जागा स्वच्छ करून तिचे सुंदर सुशोभीकरण केले आहे. आज तो भाग सडा परिसरातील एक आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मात्र, एमपीए प्रशासन केवळ ४० स्क्वेअर मीटर जागेसाठी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या पुतळ्याला विरोध करत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. महाराजांनीच भारतीय नौदलाची पायाभरणी केली, ज्यांच्या पराक्रमाच्या जोरावर आज बंदरांचे काम चालते, अशा महान नायकाच्या स्मारकाला विरोध करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

प्रशासनाला उद्देशून आमोणकर म्हणाले की, एमपीएकडे हजारो स्क्वेअर मीटर जमीन आहे, जी ते भाड्याने देऊन व्यवसाय करतात. मग केवळ ४० स्क्वेअर मीटर जागेसाठी एवढा मोठा वाद कशासाठी? जर ही जागा एमपीएची असेल, तर त्यांनी मोठ्या मनाने हा पुतळा आपल्या अधिकाराखाली घ्यावा. मात्र शिवजयंतीसारख्या कार्यक्रमांसाठी तो खुला ठेवावा. त्यांनी सरकारकडून एमपीएला पर्यायी जागा मिळवून देण्याचा प्रस्तावही मांडला आहे.

शेवटी, त्यांनी सर्व शिवप्रेमींना विनंती केली की, उच्च न्यायालयाच्या निकालाचा आपण आदर करूयात. याप्रकरणी ते कायदेशीर सल्ला घेत असून पुढील पावले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले. मुरगाव हे शांतताप्रिय शहर आहे, त्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी हात जोडून केले आहे.