
पणजी : शिरगाव (Shirgao Jatra festival) येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला (Shri Lairai Devi, Jatra) आज मंगळवारपासून सुरूवात होत आहे. आजपासून जत्रेत भक्तीचा जागर सुरू होणार आहे. व्रतस्त धोंड, भाविकांची आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनाची ओढ आता पू्र्ण होणार आहे. या जत्रोत्सवाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री लईराई संस्थान समिती व प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
गेल्या वर्षी या जत्रेला चेंगराचेंगरी होऊन दुर्घटनेचे गालबोट लागले होते. या पार्श्वभूमिवर यावर्षी अधिक खबरदारी घेतली जात आहे. धोंड, भाविकांनीही संस्थान समिती, प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून श्री लईराई देवीचे दर्शन घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री (Chier Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी सकाळी शिरगावात भेट देऊन श्री लईराई देवीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर उपस्थित अधिकाऱ्यांकडून व देवस्थान समितीकडून सर्व सुरक्षा यंत्रणा, तयारी याची माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या.
जय्यत तयारी
शिरगाव येथे आज २१ एप्रिल रोजी जत्रोत्सवात धोंड तसेच भाविकांच्या सोयीसाठी मान्यताप्राप्त स्टॉलसह परिसरात असलेली नेहमीची चहाची दुकाने सुरू राहणार आहेत. निर्बंधात किंचित शिथिलता आणणारा आदेश जारी करण्यात आला आहे. जत्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी ९०० पोलीस कर्मचारी, ३०० हून अधिक सरकारी अधिकारी, अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. मंदिर आणि परिसरात ९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मद्यविक्रीवर निर्बंध
जत्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी शिरगाव परिसरातील मुळगाव, मये, खोर्जुवे, अस्नोडा गावांतील मद्यविक्रीची दुकाने ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. निर्बंध २० एप्रिल ते २२ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
शांततेने दर्शन घेण्याचे आवाहन
दरम्यान, सर्वांनी शिस्तीचे पालन करून गोंधळ न करता शांततेने देवदर्शन घ्यावे. कुणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्री लईराई संस्थान समिती व मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.