काणकोण येथे रात्रीपर्यंत राहिलेला तिरंगा पत्रकारांनीच केला पोलिसांकडे सुपूर्द

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
काणकोण येथे रात्रीपर्यंत राहिलेला तिरंगा पत्रकारांनीच केला पोलिसांकडे सुपूर्द

काणकोण : काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिरंगा सोमवारी रात्री ८.१५ पर्यंत तसाच होता. शेवटी काणकोणच्य काही पत्रकारांनी तिरंगा पाहिला आणि काणकोण पोलीस स्थानकावर नेऊन पोलिसांकडे सुपूर्द केला.

काणकोण मामलेदार संकुलाजवळ (Canacona Mamlatdar Complex)  तिरंगा लावण्याची व उतरवण्याची जबाबदारी काणकोण पोलिसांवर (Canacona Police)  सोपविलेली आहे. सूर्योदय झाला की तिरंगा (Tricolour)  चढवण्याची व सूर्यास्त झाला की, तिरंगा उतरवण्याची तिरंगा संहिता आहे.

मात्र काणकोण प्रशासकीय इमारतीजवळ लावलेला तिरंगा सोमवारी रात्री ८.१५ वाजले तरी ‘ड्युटी’वरील पोलिसाने काढला नाही. शेवटी काणकोणमधील पत्रकार संजय कोमरपंत, बबेश बोरकर व देविदास गावकर यांनी तिरंग्याचा मान राखून  खाली उतरवला. आणि काणकोण पोलीस स्थानकावरील पोलिसांकडे सुपूर्द केला. 

यापूर्वीही चार वेळा तिरंगा वेळेवर न काढता रात्रीपर्यंत तसाच राहिला होता.  तेव्हाही संजय कोमरपंत यांनीच पोलीस स्थानकावर नेऊन दिला होता. ‘ड्युटी’वरील पोलिसांना आपल्या जबाबदारीची जाणिव का नसावी, यासंबंधी येथे खेद व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा