आंध्रच्या कुर्नूलमध्ये कार-लॉरीचा भीषण अपघात; कर्नाटकातील ८ भाविकांचा मृत्यू

१२ जण गंभीर जखमी

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
16th April, 12:06 pm
आंध्रच्या कुर्नूलमध्ये कार-लॉरीचा भीषण अपघात; कर्नाटकातील ८ भाविकांचा मृत्यू

कुर्नूल : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. मंत्रालयाम मार्गावर बोलेरो आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी कर्नाटक राज्यातील चिकमंगळूर जिल्ह्यातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चिकमंगळूर येथील भाविक कारने मंत्रालयाम येथील श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. गुरुवारी पहाटे मंत्रालयाम मंडळातील चिलकलडोना गावाजवळ समोरून येणाऱ्या लॉरीने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णतः चक्काचूर झाला.

या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जणांनी येम्मिगनूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. मृतांमध्ये लहान मुलासह महिलांचा समावेश आहे. मृतांची नावे कुमार (६०), दीपिका वीणा (३५), सुनील (४०), बेली (३), पुत्तम्मा (६०), मीनाक्षी (५०), थायम्मा (६०) आणि लोलक्षी आहेत. जखमी झालेल्या १२ प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा