लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार; डेलॉईट आणि ट्रायलीगलची मदत

मुंबई : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'च्या (TCS) नाशिक येथील बीपीओ युनिटमध्ये कर्मचाऱ्यांच्या छळवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कंपनीने आता कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आणि अंतर्गत निष्कर्षांवर कारवाई करण्यासाठी कंपनीने स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय 'ओव्हरसाईट कमिटी' (देखरेख समिती) स्थापन केली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतीवासन यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे. नाशिक युनिटमध्ये २०२२ ते २०२६ या काळात लैंगिक छळ, मानसिक छळ आणि काही बाबतीत धर्मांतरण केले गेल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

के. कृतीवासन यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कंपनीने आपल्या अंतर्गत प्रणाली आणि रेकॉर्ड्सची प्राथमिक तपासणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केले आहेत, त्यांच्याकडून कंपनीच्या अधिकृत 'नैतिकता' (Ethics) किंवा 'पॉश' (POSH) चॅनेलद्वारे पूर्वी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही, आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीने डेलॉईट (Deloitte) आणि 'ट्रायलीगल' (Trilegal) या नामांकित संस्थांची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या अंतर्गत चौकशीचे नेतृत्व टीसीएसच्या अध्यक्ष आणि सीटीओ आरती सुब्रमण्यम करत आहेत. तपासाचे सर्व निष्कर्ष केकी मिस्त्री यांच्या समितीसमोर ठेवले जातील आणि त्यांच्या शिफारसींनुसार पुढील कारवाई केली जाईल.

हे प्रकरण मार्च महिन्यात उघडकीस आले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या सहकाऱ्यावर केला होता. नाशिक पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आणि आतापर्यंत एकूण नऊ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आणि काहींनी इतर कर्मचाऱ्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. सध्या रझा मेमन, शफी शेख, आसिफ अन्सारी, शाह रुख कुरेशी, तौसिफ अत्तर आणि दानिश शेख हे पोलीस कोठडीत आहेत. तर, तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली एचआर अश्विनी चैनानी या न्यायालयीन कोठडीत आहेत. निदा खान नावाच्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

टीसीएसने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या सन्मानासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक किंवा सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असे कंपनीचे 'झिरो टॉलरन्स' धोरण आहे. नाशिकमधील युनिटचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगत कंपनीने सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासाला आणि विशेष तपास पथकाला (SIT) पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी देखील या प्रकरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक तपास करून दोषींना शिक्षा दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
