अल्पवयीनाचे शोषण करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर

अमरावती-अचलपूरमधील अयान अहमदवर कारवाई

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th April, 09:37 pm
अल्पवयीनाचे शोषण करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर

अमरावती : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या अयान अहमद याच्या घरावर बुधवारी प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. अचलपूर येथील या आरोपीने घराचा काही भाग अतिक्रमित केल्याचे समोर आल्यानंतर, नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम जमीनदोस्त केले. अचलपूरमधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
अचलपूर नगरपरिषदेच्या तपासणीत आरोपीच्या घराचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर, बुधवारी दुपारी जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने घराच्या बाजूचा लोखंडी जीना तोडण्यात आला. यावेळी भाजप आमदार प्रवीण तायडे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या गंभीर प्रकरणाचा तपास अधिक तीव्र झाला असून, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कारवाईची माहिती दिली. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डेटा गोळा केला जात आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावरून अश्लील साहित्य हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांनी हे व्हिडिओ डाऊनलोड केले किंवा जे पुन्हा प्रसारित करतील, त्यांच्यावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्यांचा शोध सुरू असून, कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांना तत्काळ अटक केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘एमआयएम’वर निशाणा
हे केवळ वैयक्तिक कृत्य नसून यामागे एक मोठे संघटित रॅकेट असल्याचा संशय खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला आहे. आरोपी एमआयएमचा कार्यकर्ता असून स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे जाळे पसरवण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. चिखलदरा परिसरातील हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या रॅकेटमधील इतर नावे समोर येतील, असेही बोंडे यांनी नमूद केले.      

हेही वाचा