
पणजी : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) मोरजी येथे एका हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी पर्यटकांचे ४.८४ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरजी (Morjim) येथील ‘टेंडर कोकोनट’ हॉटेलमध्ये १७ एप्रिल रोजी पहाटे २.३० ते सकाळी ८.३० या वेळेत ही घटना घडली. फिर्यादी गर्वित सिंग (रा. जयपूर, राजस्थान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आत प्रवेश केला.
यावेळी चोरट्याने दोन आयफोन मोबाईल (Iphone Mobile), पाकीट (ज्यात डेबिट/क्रेडिट कार्ड व ओळखपत्रे होती), बॅगसह कॅमेरा (Camera) आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हे साहित्य फिर्यादी तसेच त्यांची मैत्रीण सलोनी सेठी यांचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी मांद्रे पोलीस (Mandrem Police) स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली हरमलकर करीत असून; अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.