
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला नाशिक जिल्हा न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लैंगिक अत्याचार व शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
या प्रकरणाची सुनावणी रविवारी सुट्टीच्या न्यायालयात झाली. संशयिताला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस स्थानकात (Sarkarwada Police Station ) येथे बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी तत्काळ कारवाई केली होती.
दरम्यान, या प्रकरणात संशयिताविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
सुनावणीदरम्यान वकील किरण बेंडभार आणि शैलेन्द्र बागडे न्यायालयात हजर होते. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१५ गुन्हे दाखल
दरम्यान, अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत विविध कलमांखाली १५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Nashik Police) आतापर्यंत ४० जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत.