
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा थिवी येथे २५ मे ते ५ जून दरम्यान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या क्रीडा प्रकारातील अव्वल भारतीय खेळाडूंचा परिचय करून देणारी ही लेखमाला...
क्रीडा प्रतिनिधी स्नूकरच्या हिरव्या टेबलावर आपल्या कौशल्याने भारताचे नाव सुवर्णअक्षरात कोरणारा खेळाडू म्हणजे आदित्य मेहता. ३१ ऑक्टोबर १९८५ रोजी मुंबईत जन्मलेल्या आदित्यने गेल्या २० वर्षांत स्नूकर क्षेत्रात असे काही विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे यापूर्वी कोणत्याही भारतीयाला जमले नव्हते.
आदित्य मेहताच्या कारकिर्दीत २०१३ हे वर्ष अत्यंत मैलाचा दगड ठरले. कोलंबिया येथे झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. तसेच, एकाच वर्षात त्याने इंडियन ओपन स्नूकरची अंतिम फेरी गाठली आणि आशियाई इनडोअर गेम्समध्येही पदके पटकावली.
स्नूकरमध्ये १४७ चा ब्रेक (मॅक्झिमम ब्रेक) करणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. आदित्य मेहता हा स्पर्धात्मक सामन्यांमध्ये दोनदा १४७ चा ब्रेक करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. २०१३ मध्ये बेंगळुरू आणि २०१४ मध्ये जर्मनी येथे त्याने ही किमया साधली.
वयाची ३९ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आदित्यचा उत्साह कमी झालेला नाही. २०२५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार पुनरागमन केले.
कोलंबो (आशियाई संघ अजिंक्यपद) भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. ओमान (स्नूकर वर्ल्ड कप) भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले. बहरीन (वर्ल्ड ६ रेड स्नूकर)मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. आदित्यच्या या अफाट योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने २०१२ मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले. तसेच, २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्याला राज्याचा सर्वोच्च क्रीडा मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान केला.
९ वर्षांच्या कालावधीत चार वेळा राष्ट्रीय चॅम्पियन बनलेला आदित्य मेहता आजही नव्या पिढीच्या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे. वयाच्या ४० व्या वर्षीही तो ज्या जिद्दीने खेळत आहे, त्यावरून त्याच्या कारकिर्दीतील अजून अनेक सोनेरी पाने लिहिली जाणे बाकी आहेत, असेच वाटते.
करिअरवर एक नजर:
जन्म तारीख: ३१ ऑक्टोबर १९८५
सर्वोच्च ब्रेक (सराव): १४७ (मॅक्झिमम)
सर्वोच्च ब्रेक (स्पर्धा): १४७ (दोन वेळा)
राष्ट्रीय विजेतेपदे: ४ (२०११, २०१२, २०१६, २०२०)
अर्जुन पुरस्कार: २०१२
शिवछत्रपती पुरस्कार: २०२५
करिअरमधील महत्त्वाचे टप्पे
२००९: आशियाई इनडोअर गेम्समध्ये सुवर्ण (संघ स्पर्धा).
२०१०: ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य; वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय स्नूकर खेळाडू.
२०१२: दोहा येथे आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण.
२०१५: स्नूकर वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिले कांस्यपदक.
२०१९: म्यानमारमध्ये आयबीएसएफ वर्ल्ड टीम चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक.
