फक्त भूस्खलन होणाऱ्या जागाच नव्हेत, तर पुराखाली जाणाऱ्या भागांतही सरकारकडून उपाययोजना होत नाहीत. नदी-नाल्यांचे जुने प्रवाह लोकवस्तीच्या अतिक्रमणाखाली गेल्यामुळे मुसळधार पावसात अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होते. ही स्थिती टळावी यासाठी अशा पूरग्रस्त भागांमध्ये उपाय करण्याची गरज आहे.

मान्सून उंबरठ्यावर आहे. केरळमध्ये २६ मे रोजी पोहोचू शकतो, असा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत तो केरळमध्ये स्थिरावल्यानंतर पुढे कूच करेल. गोव्यात पुढील काही दिवसांत मान्सूनचे आगमन होऊ शकते. गोव्यात मान्सूनपूर्व कामे सध्या सुरू आहेत. मुदतीनुसार मे महिन्यात पालिकांच्या निवडणुका व्हायच्या होत्या, त्याही सरकारने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यामुळे आचारसंहिता लागू न झाल्याने कामे अडकलेली नाहीत. पालिका आणि पंचायत क्षेत्रांमध्ये सध्या मान्सूनपूर्व कामे जोरात सुरू आहेत. सरकारनेही गेल्या काही दिवसांत वारंवार पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन स्थितीबाबत बैठका घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन राज्यात पावसाळ्यात लोकांना जास्त अडचणी येऊ नयेत, यासाठी कामे करण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते आणि इतर गोष्टींची डागडुजी करण्यात व्यस्त आहे. रस्त्यांचे हॉटमिक्स अद्यापही अनेक ठिकाणी सुरू आहे. झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम अग्निशमन दलाच्या मदतीने पालिका आणि पंचायतींकडून सुरू आहे. आतापर्यंत गोव्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी प्रमाणात असला तरी राज्यात पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता कमी आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, पालिका, ग्रामपंचायती या सर्वांनीच मान्सूनपूर्व दुरुस्तीकामे आणि पावसात धोका निर्माण होईल अशा गोष्टींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यात प्रचंड पाऊस पडू लागल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. यावेळी अशा दरडींच्या ठिकाणांचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आपली यादी सरकारला सादर केली. ज्यात उत्तर गोव्यात १५ ठिकाणी, तर दक्षिण गोव्यात २५ ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपाययोजना करावयाच्या आहेत, मात्र या दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागा बहुतेक करून शहरी भागातीलच आहेत. या यादीत प्रामुख्याने शहरी भागातील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जागांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अशा धोकादायक जागांची माहिती यात दिसत नाही. गावोगावी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या अनेक जागा आहेत, तिथल्या नागरिकांना सतर्क करण्याची गरज आहे. उत्तर गोव्यात तिसवाडी, पेडणे, सत्तरी, बार्देश आणि डिचोलीतील १५ जागांचा समावेश अहवालात आहे. ज्यात मारुतीगड परिसर आल्तिनो, धुळापी-खोर्ली, किरणपाणी-पालये, महाखाजन-धारगळ, साट्रे-नगरगाव, चोर्ला घाट रस्ता, गावकरवाडा-मुळगाव, देऊळवाडा-नार्वे अशा भागांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात मुरगाव, फोंडा आणि सासष्टीतील जागांचा समावेश आहे. लोटली-वेर्णा, पाजीफोंड, खडपाबांध-फोंडा, बेतकी-खांडोळा, मुरगाव जेटीजवळ, रुमडावाडा, मायमोळे, मांगोरहिल अशा जागांचा समावेश आहे. ही यादी पाहिली तर शहरी भागांचा आणि विशेष करून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक जागांचा यात समावेश आहे. उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांना आदेश देऊन ग्रामीण भागातील दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांची माहिती मागवावी. सांगे, केपे, सत्तरी, काणकोण, धारबांदोडा या परिसरातील जागांची माहिती मिळवून तिथे उपाययोजना करण्यासाठी सरकारने आदेश द्यायला हवेत. एका रात्रीत साट्रेत एका डोंगराचा भाग कोसळण्याची घटना घडल्यानंतर ती जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला आणि लोकवस्तीला धोकादायक असलेल्या अनेक जागा गोव्यात आहेत, त्याची माहिती मिळवून तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासह लोकांना पूर्वकल्पना देण्याची गरज आहे. फक्त भूस्खलन होणाऱ्या जागाच नव्हेत, तर पुराखाली जाणाऱ्या भागांतही सरकारकडून उपाययोजना होत नाहीत. नदी-नाल्यांचे जुने प्रवाह लोकवस्तीच्या अतिक्रमणाखाली गेल्यामुळे मुसळधार पावसात अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होते. ही स्थिती टळावी यासाठी अशा पूरग्रस्त भागांमध्ये उपाय करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत ठराविक भागांमध्ये वारंवार पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. घरांमध्ये पाणी साचू लागल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात काही लोकांचे स्थलांतरही करण्याची वेळ प्रशासनावर येते. त्यामुळे भूस्खलनाबाबत उपाय करताना पूरस्थिती उद्भवते अशा परिसरांमध्येही पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे. साखळी, डिचोली, खांडेपार, सांगे यांसारख्या अनेक भागांत नद्यांना पूर आल्यानंतर घरांमध्ये पाणी घुसत असते. गोव्यातील पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यात नुकसान टाळण्यासाठी आतापासूनच जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाने ठोस उपाययोजना करायला हव्यात.