
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील ‘मेलोडी टॉफी डिप्लोमसी’ची चर्चा आता सोशल मीडियावरच नव्हे, तर पर्यटन प्रचारातही गाजू लागली आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चेचा अत्यंत कल्पकतेने वापर करत बिहार पर्यटन खात्याने सोशल मीडियावर एक भन्नाट आणि लक्षवेधी जाहिरात प्रसिद्ध केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अलीकडे इटली दौऱ्यावर गेलेल्या नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील लोकप्रिय ‘मेलोडी’ टॉफी भेट दिली होती. या छोट्याशा भेटीने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. मेलोनी यांनी स्वतः हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आणि हसत म्हणाल्या, प्रधानमंत्री मोदी यांनी मला अतिशय छान ‘मेलोडी’ टॉफी भेट दिली. मोदी आणि मेलोनी यांच्या नावांचे मिश्रण करून तयार झालेला हा शब्द याआधीही अनेक मीम्स आणि पोस्टमुळे चर्चेत होता.
याच व्हायरल ट्रेंडचा अचूक अंदाज घेत बिहार पर्यटन खात्याने आपल्या प्रचार मोहिमेत भन्नाट क्रिएटिव्हिटी दाखवली. बिहार टुरिझमच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी हे दोघेही ‘मेलोडी’ टॉफीचे पॅकेट हातात धरून हसताना दिसतात. फोटोखाली लिहिले होते, ‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू है?’
ही ओळ ‘मेलोडी’ टॉफीच्या जाहिरातीमधील लोकप्रिय वाक्य आहे. मात्र बिहार पर्यटन खात्याने याच ओळीचा हुशारीने वापर करत खाली बिहारमधील निसर्गरम्य धबधब्याचा फोटो जोडला आणि लिहिले, ‘और हमारा बिहार इतना खूबसुरत क्यू है?’ त्यानंतर आणखी एक आकर्षक ओळ देण्यात आली ‘बिहार घुमिये, खुद जान जाये’
या संपूर्ण मोहिमेने सोशल मीडिया यूजर्सचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी बिहार पर्यटन खात्याच्या या मार्केटिंग आयडियाचे कौतुक केले असून, सरकारी विभागाने ट्रेंडिंग विषयांचा इतक्या स्मार्ट पद्धतीने वापर केल्याचे म्हटले आहे. काही यूजर्सनी तर याला ‘टॉफी डिप्लोमसीचे सर्वात गोड उदाहरण’ असेही संबोधले.
सध्या डिजिटल युगात सोशल मीडिया ट्रेंड्सचा वापर करून पर्यटन आणि ब्रँड प्रमोशन करण्याची स्पर्धा वाढली आहे. बिहार पर्यटन खात्याने मात्र या मोहिमेद्वारे सर्जनशीलता, विनोद आणि स्मार्ट मार्केटिंग यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. एका साध्या टॉफीपासून सुरू झालेली चर्चा आता बिहारच्या पर्यटन प्रचारासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे ‘मेलोडी डिप्लोमसी’ केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता पर्यटन क्षेत्रालाही गोडी लावत असल्याचे चित्र दिसत आहे.