अद्वैत भाव : तुझा नि माझा एकपणा

ईश्वरी विभूतींचा महिमा सांगताना जेव्हा भेद विरघळतो, तेव्हा भक्त आणि भगवंताचे अद्वैत नाते उलगडते. गीतेच्या 'विभूतीयोगा'तील तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा हा एक भावपूर्ण संवाद.

Story: विचारचक्र |
24th May, 08:33 pm
अद्वैत भाव : तुझा नि माझा एकपणा

तुझे नाव मुखी एकदा जरी आले ना की मग भेद तरी कुठे राहील आणि कसा राहील?

"तुझा नि माझा एकपणा, कसा कळावा शब्दांना," असे झाले आहे आता आपले! तुझे नाव एकदा जरी कानी आले तरी तो भेद दूर पळून जातो. आणि असा जो तू 'पूर्ण परब्रह्म ईश' आहेस, तो आज सुदैवाने माझ्या स्वाधीन झाला आहेस. मग आता भेद कुठला? आणि जर भेदच नाही, तर तो सोडायचा कुठे आणि कसा?

मागील लेखात आपण दहाव्या अध्यायाच्या ३८ व्या श्लोकाचे विस्तृत विवेचन बघितले होते. आता त्यापुढील श्लोकाकडे वळूया.  

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुनम्।  न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्।।

३९।।नान्तोsस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप। एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया।।४०।।

सरळ अर्थ : हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण आहे ते सुद्धा मीच आहे. कारण असे चर किंवा अचर एखादेही भूत (म्हणजे अस्तित्वात असलेले असे काहीही) नाही की जे माझ्याखेरीज अस्तित्वात असू शकेल. म्हणून सर्व काही माझेच स्वरूप आहे.

हे परंतपा, माझ्या दिव्य विभुतींचा अंतच नाही. परंतु हा मी आपल्या विभुतींचा विस्तार तुला एकदेशी अर्थात संक्षेपाने सांगितला आहे.

विस्तृत विवेचन : तेव्हा श्रीकृष्ण पार्थास म्हणाले, हे धनुर्धरा, पावसाच्या धारा कधी मोजता येतील का? कशा मोजशील सांग! किंवा जमिनीवर गवताची पाती उगवतात त्यांची गणती करता येईल काय?

महासागरात ज्या लहानमोठ्या असंख्य लाटा उठतात, त्या मोजता येतील? तसे माझे विभुती-विशेष असंख्य आहेत हे तू लक्षात घे. तरीही त्यातल्या मुख्य मुख्य अशा पंचाहत्तर तुला सांगितल्या. पण हे वर्णन माझ्या विभुतींच्या मोजदादीच्या दृष्टीने निरर्थक आहे.

म्हणून त्या मी तुला किती सांगू आणि तू किती ऐकशील? म्हणून तुला आता मी स्वतःची एक गुप्त खूण सांगतो, ती नीट ऐक. प्राणिमात्ररूपी अंकुराने जे जे काही रुजते ते सगळे आदिबीज मीच होय हे तू निश्चितपणे समज. त्यातल्या कुणालाही उच्च, नीच, लहान, थोर असे न मानता वा समजता ती सगळी वस्तुजात मीच एक आहे, असे ठामपणे मान.

याही वर आता अर्जुना, ज्यायोगे तू अनायासे माझ्या विभुतींना जाणशील अशी आणखी एक सर्वसाधारण खूण तुला सांगून ठेवतो.

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा। तत्तदेवाwवगच्छ त्वं मम तेजोंsशसंभवम्।।४१।।

अर्थ : जी जी काहीही विभुतियुक्त अर्थात् ऐश्वर्ययुक्त व कांतियुक्त आणि शक्तिसंपन्न वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशानेच उत्पन्न झालेली जाण. अर्थात्, ऐश्वर्य आणि दया हे दोन्हीही गुण जिथे एकत्र नांदतात ती माझीच विभूति होय, हे तू नि:संशय समज.

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन। विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्।।४२।।

सरळ अर्थ : अथवा हे अर्जुना, हे इतके फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी हे सर्व जगत् आपल्या योगमायेच्या एका अंशमात्राने धारण करून स्थित आहे. यासाठी मलाच तत्वतः जाणावे म्हणजे झाले.

विस्तृत विवेचन : आता असे बघ, की आकाशात फक्त एकच बिंब, पण त्याचे तेज त्रैलोक्यात सगळीकडे फाकते! त्याचप्रमाणे असा कोणीतरी एक असतो, ज्याची आज्ञा सर्व लोक नि:शंक पाळतात. अशांना ते एकटेच आहेत, असे कसे म्हणायचे? कामधेनुकडे जो जो जे जे जेव्हा जेव्हा मागेल तेव्हा ती ते त्याला लगेच देते. तिला धनहीन समजायचे का? तसे विश्वातले सगळे ऐश्वर्य एखाद्याकडे मूळातच असणे हीच त्याच्या विश्व-वंद्यत्वाची खूण असते. त्याच्याच आज्ञेला लोक नि:शंक मानतात. असे जे जे लोकमान्य पुरुष असतात ते सगळे माझेच अवतार होत. याचे कारण या संपूर्ण विश्वात मीच एक भरून राहिलेलो आहे. पण साधारण व अनन्यसाधारण यांच्यात वेगळेपण आहे की नाही? साधारण हा साधारण असतो. पण अनन्यसाधारण तसा असतो का? नाही. त्याला साधारण मानणे ही मोठी चूक होय. अशी चूक करणे हे दोषात्मक आहे. बुद्धीला भेदाचा कलंक लावता येतो का? अमृत जवळ असेल तर ते कोणी आटवायला जाईल का? तयार तूप समोर असताना ते कोणी घुसळायला बघेल का? वाऱ्याला उजवे डावे असे काही असते का? सूर्याची पाठ आणि पोट बघायला गेले तर दृष्टीच नासेल पाहणाऱ्याची. तसेच पार्था, माझ्या बाबतीत सामान्य वा असामान्य ही भाषाच लोप पावते! माझ्या भिन्न भिन्न विभुतींना जाणण्याचा प्रयत्न करून मला अपाराला किती मोजशील? त्यापेक्षा राहू दे ते. माझ्या एका अंशाने हे विश्व व्यापलेले आहे. म्हणून आता भेदभाव मानणे सोडून सर्वत्र मीच एकसारखा आहे, हे सत्य मनात दृढ धरून ऐक्यभावाने भजन कर.

मग तो सर्व-गुण-ऐश्वर्य-संपन्न असा श्रीकृष्ण देव म्हणाला की जसे वनासाठी वसंत ऋतू आगमन झाले की वनातील किंवा जंगलातील सगळ्या जीवांना तरतरून नवेपणा प्राप्त होतो, नवजीवन लाभल्याचा अनुभव येतो तसा ज्ञानीजनांचा सहवास हा विरक्तांना नवजीवन प्रदान करणारा असतो.

हे एवढे सगळे ऐकता ऐकता अर्जुनाचे मानसिक व्यक्तिमत्व आपोआपच कसे कृष्णमय होऊन गेले होते हे अर्जुनाच्या सुद्धा लक्षात आले नाही! तो म्हणाला हे स्वामी श्रीकृष्णा, भगवंता, काय सांगत आहेस तू हे मला? भेद वेगळे मानायला मी काय तुझ्याहून भिन्न आहे का? भेद तो निराळा आणि आम्ही-आपण निराळे असे आता काही राहिलेलेच नाही! अहो, अंधार दूर सारा असे सूर्य कधी लोकांना सांगेल का? पण मग मी तुला अविचारी कसा म्हणू? मला शोभेल का ते? तुझे नाव मुखी एकदा जरी आले ना की मग भेद तरी कुठे राहील आणि कसा राहील?

"तुझा नि माझा एकपणा, कसा कळावा शब्दांना," असे झाले आहे आता आपले! तुझे नाव एकदा कानी जरी आले तरी तो भेद दूर पळून जातो. आणि असा जो तू 'पूर्ण परब्रह्म ईश' आहेस तो आज सुदैवाने माझ्या स्वाधीन झाला आहेस. मग आता भेद कुठला? आणि जर भेदच नाही, तर तो सोडायचा कुठे आणि कसा? (क्रमशः)


- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३