सध्या या पक्षाचा धुरळा समाजमाध्यमांवरच उठत असला तरी देशात एकत्र येण्यासाठी हाक दिली तर त्यासाठीही हजारो तरुण एकत्र येतील. हाच बदल व्हायला हवा. तरुणांनी प्रश्नांप्रती जागरूक व्हायला हवे. एकत्र यायला हवे. फक्त सोशल मीडियावर आवाज उठवून चालणार नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारीही ठेवायला हवी.

सरन्यायाधीशांनी एका याचिकेवरील सुनावणीवेळी केलेल्या विधानामुळे सध्या देशात नाराजीचे वातावरण आहे. इतरांना त्याचा काही फरक पडत नसला तरी आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवी लोक आणि बेरोजगार तरुण यांच्यात सरन्यायाधीशांच्या विधानामुळे प्रचंड असंतोष आहे. आता सरन्यायाधीशांनी खुलासा केला आहे, पण त्यापूर्वीच ज्यांना झुरळासारखे म्हटले होते, त्यांनी आपला स्वतंत्र पक्षही सुरू केला. जरी तो पक्ष नोंदणीकृत नसला, तरी त्या बॅनरखाली पाच दिवसांत ५७ लाख लोक एकत्र आले. यावरून देशातील तरुणांमधील असंतोष किती टोकाचा आहे, ते लक्षात येते. हा 'कारवाँ' वाढत असल्याने, सरन्यायाधीशांच्या विधानाचा देशातील समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी फायदाच झाला, असे म्हणावे लागेल. सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' या नावाखाली वेबसाईटही सुरू झाली असून पक्षाचा पाच मुद्द्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे; तसेच इन्स्टावर ५७ लाख फॉलोअर्स झाले आहेत. इतक्या लवकर एखादा समूह इतका प्रचंड प्रसिद्धीस येण्याची या काळातील ही पहिलीच घटना आहे. या संकल्पनेमागे अमेरिकेत बसलेला एक तरुण आहे. आता या समूहाची क्रेझ अशा पद्धतीने तयार होत आहे की, प्रसारमाध्यमांनाही त्याकडे दुर्लक्ष करता येईना. सगळ्याच माध्यमांनी त्याची दखल घेतली आहे, मात्र काही धनिकांच्या हाती असलेल्या माध्यमांना या 'कॉक्रोच जनता पार्टी'ने थेट इशारा दिला आहे. सत्तेत आल्यास त्यांचे परवाने रद्द करणे, निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभेवर येता येणार नाही असा कायदा करणे, पक्षांतर करणाऱ्या खासदार-आमदारांना निवडणूक लढण्यास बंदी घालणे, महिलांना थेट ५० टक्के आरक्षण देणे अशा संकल्पना यात मांडण्यात आल्या आहेत. मोठी समिती, कार्यकारिणी आहे किंवा फार विचार करून केलेला हा पक्ष आहे, असेही नाही. पण त्यांना जो पाठिंबा तरुणांकडून मिळत आहे ते पाहता, किमान सोशल मीडियावर हा पक्ष नक्कीच आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची जाणीवही काहींना झाली आहे. सरन्यायाधीशांनीही आपल्या परीने आपण तसे बोललो नव्हतो, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, अशा प्रकारचा खुलासाही केला आहे.
नेपाळने 'जेन झी' ही नवी पिढी काय करू शकते याचा अनुभव घेतला आहे. तिथल्या आंदोलनानंतर जगभरात 'जेन झी'ला चिथावण्याच्या फंदात कोणी पडेल, असे दिसत नाही. सर्वांनीच तरुणाईचा धसका घेतला आहे. उलट तरुणांप्रती जास्त आपुलकी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न काही नेते करू लागले आहेत. त्यातच भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी 'समाजात पूर्वीपासूनच काही परजीवी लोक आहेत, जे व्यवस्थेवर सातत्याने हल्ले करतात, काही युवक असे आहेत, ज्यांना नोकरी मिळत नसल्यामुळे ते झुरळासारखे सर्वत्र पसरतात' असे विधान समोर आल्यानंतर तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये यावरून गदारोळच माजला. इथल्या व्यवस्थेला कंटाळलेल्या तरुणांच्या आवाजासाठी काहीतरी निमित्त हवे होते. सरन्यायाधीशांच्या विधानामुळे त्यांना निमित्त मिळाले. त्यानंतर समाजमाध्यमांवर झुरळ म्हणजेच कॉक्रोच पक्ष स्थापन करण्याची संकल्पना मांडली गेली आणि बघता बघता तो ट्रेंड झाला. इन्स्टा, एक्स आणि फेसबुकवर पेजेस तयार करण्यात आली. स्वतंत्र वेबसाईट तयार केली गेली. मूळ संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील अभिजीत दिपके, जे बोस्टनला असतात, ते या पक्षाचे संस्थापक आणि निमंत्रक झाले. लाखो लोक सध्या वेबसाईटवर नोंदणी करत आहेत. यात तरुणांचा जास्त भरणा आहे. इन्स्टावर ५७ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळेच या कॉक्रोच जनता पार्टीचा धसका राजकीय पक्षांनी घेतला आहे. दिपके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलेले मतही फार सूचक आहे. ज्या पद्धतीने तरुण कॉक्रोच पार्टीकडे जोडले जात आहेत, तो राग केवळ सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानामुळे नाही. तर हा संपूर्ण व्यवस्थेवरचा राग आहे. अनेक वर्षांपासून देशातील तरुण वर्गात जी नाराजी होती, ती आता व्यक्त होत आहे. त्यांना व्यासपीठ मिळाले आहे, असे दिपके म्हणतात. सध्या या पक्षाचा धुरळा समाजमाध्यमांवरच उठत असला तरी देशात एकत्र येण्यासाठी हाक दिली तर त्यासाठीही हजारो तरुण एकत्र येतील. हाच बदल व्हायला हवा. तरुणांनी प्रश्नांप्रती जागरूक व्हायला हवे. एकत्र यायला हवे. फक्त सोशल मीडियावर आवाज उठवून चालणार नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारीही ठेवायला हवी. हे क्रांतीचे झुरळ सर्वत्र पसरायला हवे.