माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवी झेप आवाक्यात !

आता पुढचा टप्पा म्हणजे जगाचे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा जगासाठी तंत्रज्ञान निर्माण करणे आणि त्या दिशेने भारताची पावले वेगाने पडताना दिसत आहेत, हाच संदेश आशांक देसाई यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभात सहभागी झालेल्या दिग्गजांनी दिला.

Story: विचारचक्र |
18th May, 11:18 pm
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवी झेप आवाक्यात !

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा प्रवास हा गेल्या चार दशकांतील भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक आणि बौद्धिक परिवर्तनांपैकी एक मानला जातो. एकेकाळी कृषिप्रधान आणि परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला देश आज जगातील डिजिटल आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार बनला आहे. या परिवर्तनामागे केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर दूरदृष्टी, नेतृत्व, जागतिक विचारसरणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोठा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी अगदी एकजुटीने कार्यरत राहून हे परिवर्तन घडवून आणले, असे म्हणता येईल. याच एकजुटीचे प्रतिबिंब परवा मुंबईत, जिथे गोव्याचे सुपुत्र आणि आमचे शाळेपासूनचे मित्र आशांक देसाई यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभात पाहायला मिळाले. आशांक देसाई यांची ओळख आज भारतीय आयटी उद्योगाचा पाचवा स्तंभ म्हणून केली जाते. त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय आयटी विश्वातील बहुतेक सगळ्याच दिग्गज मान्यवरांनी लावलेली उपस्थिती ही त्यांच्या योगदानाची घेतलेली सामाजिक आणि व्यावसायिक दखलच असे म्हणता येईल. भारतीय आयटी उद्योगाला जागतिक विश्वासार्हतेचा चेहरा ज्यांनी दिला, ते एन. आर. नारायण मूर्ती यांची या समारंभातील उपस्थिती खूप काही सांगून गेली. त्यांच्यासह अशी अनेकांची नावे घेता येतील की ज्यांनी भारतीय आयटी उद्योगाला आजचा दर्जा मिळवून देण्यात भरीव योगदान दिले, ते या समारंभास हजर होते. यामध्ये ‘पद्मश्री’ प्रो. दीपक बी. फाटक, प्रो. देवांग खाखर, एनआयआयटीचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक राजेंद्रसिंह पवार, आयटी उद्योजक आणि नासकॉमचे सह-संस्थापक हरीष मेहता, प्रो. एस. पी. सुखात्मे, अनुराग बात्रा असे अनेक जण होते, की आयटी उद्योगाने देशात जी आज उत्तुंग झेप घेतली आहे ती त्यांच्या योगदानाविना अशक्यच होती.

आशांक देसाई यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभ हा वाढदिवस कमी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा एक मेळावाच आमच्यासारख्यांना वाटला. खरे पाहता याच एकजुटीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज भारतीय आयटी उद्योगाला अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी वावरत आहेत, याचा साक्षात्कार झाला. आशांक देसाई यांनी तर स्पष्टच शब्दात ‘आम्ही सगळे साथ साथ आहोत’ याची ग्वाही देत भारतीय आयटी उद्योगाला उज्ज्वल भवितव्य असल्याचेच सूचित केले. भारताने मागील तीन-साडेतीन दशकांत माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रात घेतलेली झेप ही देशाच्या आर्थिक इतिहासातील सर्वांत मोठ्या परिवर्तनांपैकी एक मानली जाते. एकेकाळी केवळ स्वस्त मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणून ओळख असलेला भारत आज सॉफ्टवेअर विकास, डिजिटल सेवा, क्लाऊड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, फिनटेक आणि स्टार्टअप परिसंस्थेमध्ये महत्त्वाचा जागतिक खेळाडू बनला आहे, याची दखल घ्यावीच लागेल आणि हा प्रवास तसा सोपा अजिबात नव्हता. एक-दोन मान्यवरांशी झालेल्या त्रोटक चर्चेतून आपण आज नेमके कुठे आहोत, जागतिक स्पर्धेत आम्हाला अजून काय करायचे आहे, अमेरिका-चीनला कसे गाठता येईल, याबाबत आमच्या ज्ञानात बरीच भर पडली. भारतीय आयटी उद्योगाची कथा ही केवळ उद्योगाची कथा नाही; ती आधुनिक भारताच्या परिवर्तनाची कथा आहे. काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्या वृक्षाला अधिक बळ देण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे आणि म्हणूनच आशांक देसाई यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून भारतीय माहिती तंत्रज्ञानाच्या समृद्ध प्रवासाला दिलेला आदर आहे.

भारतीय आयटी उद्योगाचा विकास तीन टप्प्यांत झाला. पहिला टप्पा होता सॉफ्टवेअर सेवा निर्यात आणि आउटसोर्सिंग. जगातील मोठ्या कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी भारताकडे पाहिले. दुसऱ्या टप्प्यात भारताने केवळ ‘सेवा पुरवणारा देश’ म्हणून नव्हे तर ‘तांत्रिक उपाय आणि संशोधन क्षेत्रातील भागीदार‘ म्हणून स्थान निर्माण केले. तिसरा आणि सध्याचा टप्पा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल परिवर्तन आणि स्वयंचलित प्रणालींचा. आज भारताचे जागतिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जगातील अनेक प्रमुख कंपन्यांची तांत्रिक केंद्रे भारतात आहेत. जगभर वापरल्या जाणाऱ्या डिजिटल सेवा, बँकिंग प्रणाली, ई-कॉमर्स, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि क्लाऊड प्रणालींमध्ये भारतीय अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपासून युरोप, मध्यपूर्व आणि आशियाई देशांपर्यंत भारतीय तंत्रज्ञांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. तथापि पुढील वाटचाल आव्हानांशिवाय नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलनामुळे पारंपरिक नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. केवळ कोडिंग पुरेसे राहणार नाही. सर्जनशील विचार, संशोधन क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोन यांना अधिक महत्त्व मिळेल. भारताला आता ‘सेवा पुरवणारा देश’ या प्रतिमेतून बाहेर पडून ‘ज्ञान निर्माण करणारा देश’ म्हणून उभे राहावे लागेल. भारताची तरुण लोकसंख्या आणि तांत्रिक कौशल्य हा आपला सर्वात मोठा ठेवा आहे.

जागतिक स्पर्धेच्या संदर्भात पाहिले तर भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याच्याकडे असलेले प्रचंड मनुष्यबळ. दरवर्षी लाखो अभियंते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून रोजगार बाजारात येतात. तसेच भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स, हेल्थ टेक आणि शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय कंपन्या नवनवीन प्रयोग करत आहेत. तथापि, जागतिक स्पर्धेत काही आव्हानेही आहेत. भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर सेवा-आधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. जगातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उत्पादने, चिप निर्मिती, मूलभूत संशोधन आणि जागतिक स्तरावरील हार्डवेअर उत्पादनात भारताची उपस्थिती तुलनेने कमी आहे.

भारतासाठी आशादायक बाब म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा, सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे भारत नव्या तंत्रज्ञान क्रांतीसाठी सज्ज होत आहे. आगामी दशकात चिप निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि सायबर सुरक्षेत भारताने अधिक गुंतवणूक केली, तर तो केवळ आयटी सेवा देणारा देश न राहता तंत्रज्ञान नेतृत्व करणारा देश बनू शकतो. भारताची आयटी क्षेत्रातील वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगतीची कथा नाही; ती ज्ञान, कौशल्य आणि जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची कहाणी आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे जगाचे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा जगासाठी तंत्रज्ञान निर्माण करणे आणि त्या दिशेने भारताची पावले वेगाने पडताना दिसत आहेत, हाच संदेश आशांक देसाई यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस समारंभात सहभागी झालेल्या दिग्गजांनी दिला.


- वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९