चीनसाठी हेरगिरी; माजी महापौर अडचणीत

Story: विश्वरंग |
15th May, 10:38 pm
चीनसाठी हेरगिरी; माजी महापौर अडचणीत

कॅलिफोर्नियातील आर्काडिया शहराच्या माजी महापौर ईलीन वांग यांनी चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांची कबुली दिल्याने अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयच्या चौकशीत वांग यांनी चीन सरकारच्या सूचनेनुसार अमेरिकेत चीनसमर्थक वातावरण निर्माण करण्यासाठी काम केल्याचा आरोप मान्य केल्याचे समोर आले आहे.

२०२० ते २०२२ या कालावधीत वांग यांनी एका ऑनलाइन वृत्तसंकेतस्थळाच्या माध्यमातून चीनसमर्थक प्रचाराला चालना दिली. त्या काळात अमेरिकेत ज्यो बायडेन यांचे प्रशासन सत्तेत होते. एफबीआयच्या माहितीनुसार, वांग यांनी चीनच्या कम्युनिस्ट सरकारच्या निर्देशानुसार विविध प्रचारात्मक सामग्री प्रसारित केली. आर्काडिया शहरात २०२२ मध्ये ईलीन वांग यांची महापौर म्हणून निवड झाली होती. मात्र, चीनसाठी काम करत असल्याचे आरोप सार्वजनिक झाल्यानंतर त्यांच्यावर मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला. वाढत्या टीकेनंतर त्यांनी अखेर महापौरपदाचा राजीनामा दिला.

चिनी वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या वांग यांच्यावर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. त्यांनी सोशल मीडिया आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून चीनसमर्थक पोस्ट आणि विचार प्रसारित केल्याचे तपासात समोर आले. तपास यंत्रणांच्या मते, वांग या चीनमधील आपल्या संपर्कांच्या सूचनेनुसार अमेरिकेत चीनच्या हिताचे प्रचारकार्य करत होत्या. एफबीआयने या प्रकरणात पुरेसे पुरावे मिळाल्याचा दावा केला असून, दोष सिद्ध झाल्यास त्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना लॉस एंजिलिस एफबीआय प्रमुखांनी गंभीर चिंता व्यक्त केली. एका निवडून आलेल्या अधिकाऱ्याने परकीय सरकारसाठी उघडपणे प्रचार करणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अमेरिकेच्या सुरक्षेविरोधात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एफबीआय कटिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणात वांग यांचे पूर्व मंगेतर योनिंग माइक सन यालाही अटक करण्यात आली होती. त्यानेही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनसाठी काम केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर ईलीन वांग यांच्यावरील संशय आणखी गडद झाला आणि अखेर त्यांनीही आरोप मान्य केले. वांग यांच्या वकिलांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईलीन वांग यांनी वैयक्तिक पातळीवरील चुका मान्य केल्या असून त्या याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. आर्काडिया समुदायाविषयी त्यांचे प्रेम आणि बांधिलकी कायम आहे.

या प्रकरणामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर परकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत चीनच्या प्रभाववाढीबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राजकीय, तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रात चीनकडून हस्तक्षेप होत असल्याचे आरोप अमेरिकन यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत आहेत.

- सुदेश दळवी