मुख्य वीज अभियंता : मोबाईलपेक्षा स्मार्ट मीटरचे रेडिएशन असते कमी

पणजी : स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना कोणत्या दिवशी किती वीज वापरली, याचे अचूक प्रमाण कळणार आहे. मोबाईलच्या तुलनेत स्मार्ट मीटरचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूपच कमी असते, अशी माहिती मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.
स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य अभियंत्यांनी ही माहिती दिली.
केंद्राच्या आदेशानुसार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. याला काही लोक विविध कारणांमुळे विरोध करत आहेत. या संदर्भात वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली.
मीटर बसवण्यासाठी संमतीची गरज नाही
स्मार्ट मीटर ही वीज खात्याची मालमत्ता आहे. त्यामुळे हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांच्या संमतीची आवश्यकता नाही. पूर्वीचे मीटर बसवतानाही ग्राहकांची संमती घेतली जात नव्हती. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दररोजच्या वीज वापराचा हिशोब कळेल. कोणत्या उपकरणाला किती वीज लागते, हेदेखील स्पष्ट होईल, जे सध्या शक्य नाही. यामुळे कोणत्या वेळी विजेची मागणी जास्त असते, याची माहिती खात्याला मिळेल. स्मार्ट मीटरचे रेडिएशन मोबाईलपेक्षा कमी असते. तसेच, या मीटरशी मानवाचा थेट संपर्क येत नाही, असे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले.
वीज कपात आणि पूर्वसूचना
बिल भरले नाही तर सध्याप्रमाणेच वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज कापण्यापूर्वी ग्राहकाला मोबाईलवर संदेश येईल. रात्रीच्या वेळी तसेच सुट्टीच्या दिवशी वीज जोडणी तोडली जाणार नाही. प्री-पेड मीटरमध्ये ग्राहकांना आपल्या सोयीनुसार पैसे भरता येतील. जोपर्यंत खात्यात पैसे शिल्लक आहेत, तोपर्यंत वीज पुरवठा सुरू राहील.
कामे पूर्ण करण्यासाठी २० मे ची मुदत
सध्या भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे, ज्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. ही सर्व कामे आणि पावसाळ्यापूर्वीची इतर महत्त्वाची कामे २० मे पर्यंत पूर्ण केली जातील.
विजेच्या मागणीचा विक्रम
राज्याची विजेची गरज सातत्याने वाढत आहे. यंदा पीक अव्हरमध्ये ९९५ मेगावॉट विजेचा वापर झाला, जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे.
जे ग्राहक मंजूर मर्यादेपेक्षा जास्त विजेचा वापर करतात, त्यांनी आपला लोड वाढवून घ्यावा. यासाठी अर्ज करून शुल्क भरावे लागेल. मर्यादेपेक्षा जास्त वीज वापरल्यास दंड आकारला जातो, ज्यामुळे वीज बिल जास्त येते.
- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री