
पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) मधील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली असून, पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांतील शाब्दिक युद्ध कमालीचे आक्रमक झाले आहे. पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून आमदार वीरेश बोरकर यांच्यावर निशाणा साधताना अत्यंत सूचक शब्दांत टीका केली आहे. सांत आंद्रेत केवळ सायलंट ऑर्चडच (Silent Orchard) नव्हे, तर एक सायलंट व्यक्ती देखील आहे! असे म्हणत खोलकर यांनी आमदार बोरकर यांच्या शांत राहण्याच्या भूमिकेवर कोपरखळी मारली आहे. इतकेच नव्हे तर, तुमच्या तथाकथित शांततेची (Peace) शकले पडली आहेत, असे म्हणत त्यांनी आझाद मैदानावर पुन्हा ३९ (अ)चा लढा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. या पोस्टला पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी येतोय आम्ही, तयार राहा! असे म्हणत पाठिंबा दिल्याने पक्षातील फूट आता उघड झाली आहे.

या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वी आगशीचे पंच ज्युलिअस आल्मेदा यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे पडली होती. आल्मेदा हे आमदार वीरेश बोरकर यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. या कारवाईनंतर आरजीपीमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले. सुरुवातीला आमदार बोरकर यांनी पक्षात 'सर्व काही आलबेल' असल्याचे सांगत पत्रकारांशी बोलताना या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले होते. मात्र, मंगळवारी मनोज परब यांनी सोशल मीडियावर आक्रमक होत सेंट लॉरेन्सच्या जिल्हा पंचायत सदस्या तृप्ती बकाल, आदित्य देसाई आणि लिसियो रोन्कोन यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर थेट टीका केली. या टीकेला उत्तर म्हणून वीरेश बोरकर यांनी बुधवारी रात्री केवळ "पीस" (शांतता) अशी पोस्ट केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी मनोज परब यांनी वाटाण्याचे (Green Peas) इमोजी वापरून 'सायलंट कावर्ड मॅच्युरिटी' असा हॅशटॅग लावत बोरकरांच्या संयमाला भ्याडपणाची जोड दिली.

पक्षातील हा वाद आता केवळ नेत्यांपुरता मर्यादित न राहता सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी उघडपणे मनोज परब यांची बाजू घेतली असून, आमदार बोरकर यांना आगामी बैठकीला उपस्थित राहण्याचे आव्हान दिले आहे. नाईक यांनी आमदारांच्या समर्थकांवर 'स्लो पॉयझनिंग' केल्याचा आणि बनावट फेसबुक पेजेस चालवून नेत्यांची बदनामी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दुसरीकडे, आमदार वीरेश बोरकर यांच्या 'सांत आंद्रे ब्लॉक'ने मनोज परब आणि अजय खोलकर यांच्या विधानाचा तीव्र निषेध करणारे अधिकृत पत्रक जारी केले आहे. जोपर्यंत हे मतभेद मिटत नाहीत, तोपर्यंत आमदारांनी कार्यकारिणीच्या बैठकीला जाऊ नये, अशी विनंतीही या ब्लॉकने केली आहे.

सद्यस्थितीत आरजीपीमधील ही यादवी वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचली आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असून, मनोज परब यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही हल्ले केले जात आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, दोन्ही गटांनी आता कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली असून, पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वकिलांची मदत घेतली जात आहे. दीड महिन्यांपासून आमदारांचा पक्षाच्या कार्यकारिणीशी संपर्क तुटलेला असून, ही फूट आता गोव्याच्या राजकारणात आरजीपीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

तर, आरजीपीच्या कार्यकारिणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पण आमदार बोरकर त्यांना प्रतिसाद देत नाहीत. मागील दीड महिन्यात आमदार बोरकर यांनी पक्षाच्या कार्यकारिणीशी संपर्क पूर्णपणे तोडलेला आहे. त्यांना बैठकीसाठी बोलविण्याकरिता व्हॉट्सअॅप, ईमेलवर कित्येक संदेश पाठवण्यात आले. पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत बोरकर यांना आमंत्रित केले आहे. बैठकीत समझौता होण्याची आशा आम्हाला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आरजीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.