आमदार बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे!

पणजी : कॉंग्रेस पक्षाचे फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवार तथा प्रख्यात फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) यांच्या अकाली निधनामुळे गोव्यावर (Goa) शोककळा पसरली आहे. प्रख्यात फिजिओथेरपिस्ट म्हणून ओळख निर्माण करतानाचा गोव्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉ. भाटीकर यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. आमदार बनून गोव्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल राजकीय, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसहीत अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मगो पक्षातून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द घडवली. सुरुवातीला भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यमातून त्यांनी पणजी विधानसभा निवडणूकही लढवली होती. २०२२ मध्ये मगो पक्षाच्या उमेदवारीवर डॉ. केतन भाटीकर यांनी भाजपचे नेते रवी नाईक यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली व अवघ्या ७० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. नुकत्याच रद्द झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी जोरदार प्रचारही केला होता. मात्र, विधानसभा निवडणूक न्यायालयाच्या आदेशानंतर मतदानाच्या एक दिवस आधी रद्द करण्यात आली होती.
डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
समाजासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील : गोवा प्रदेश कॉंग्रेस
डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनाबद्दल गोवा प्रदेश कॉंग्रेसतर्फे (Goa Pradesh Congress Committee) तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. सार्वजनिक सेवेसाठी त्यांची अविरत निष्ठा तसेच पक्ष आणि समाजासाठी दिलेले योगदान सदैव आदर आणि कृतज्ञतेने स्मरणात राहील, असे प्रदेश कॉंग्रेसने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाची माहिती ऐकून अत्यंत धक्का बसला. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि मित्रपरीवाराप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो; असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
गतिमान नेता गोव्याने गमावला : प्राचार्य सुभाष वेलींगकर
डॉ. केतन भाटीकर अकालीच अनपेक्षितपणे गेला! समाजकार्याची अंतस्थ तळमळ आणि संकल्पित गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची जबरदस्त क्रियाशीलता असलेला हा उमद्या व्यक्तीमत्वाचा एक योद्धा कार्यकर्ता, कुशल संघटक सर्वांना अस्वस्थ व व्याकुळ करत तडकाफडकी निघूनही गेला. फोंडा परिसर त्याच्या जाण्याने नि:स्त्राण झाल्यागत वाटते. काही महिने जरी गोवा सुरक्षा मंचच्या कामात राहिला; पणजी मतदारसंघाचा गो. सु. मो.चा पणजी मतदारसंघाचा गड अत्यंत अपुऱ्या साधनसामुग्रीनिशी आत्मविश्वासाने लढवला, तो अत्यंत विरळा होता. एक गतिमान नेता गोव्याने गमावला हे निश्चित! त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांना या आघातातून बाहेर येण्यासाठी लागणारे मनोधैर्य ईश्वर प्रदान करो! अशा शब्दात प्राचार्य सुभाष वेलींगकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
जिद्द, संघर्ष याचा दुर्दैवी अंत! : माजी खासदार ॲड.नरेंद्र सावईकर
राजकारणाच्या सारीपाटावर वैचारिक दृष्ट्या आम्ही विरुद्ध दिशेने होतो खरे. फिजिओथेरपिस्ट असलेल्या केतन भाटीकर यांनी सदर प्रॅक्टिस करणाऱ्यांना डॉक्टर म्हणता यावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मी खासदार असताना दिल्लीत यायचा. दोघे मिळून अनेकांना भेटले. त्यात त्यांना यश पण आले. सहज हार मानणारा नाही हे दिसायचे. ठरवले की या लढ्यात त्याच्य मागे उभे रहायचे. त्यासाठी सर्वकाही पणाला लावले. परिस्थितीपुढे झुकला नाही. शेवटपर्यंत जिंकायची जिद्द घेऊन कार्यरत राहिला. आयुष्य खरेच अनिश्चित आहे. डॉ. केतन भाटीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनाबद्धल मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहीत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.