
पणजी : गोव्यातील रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातील (Revolutionary Goans Party) अंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका क्रिप्टीक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पोस्टनंतर आमदार बोरकर यांनीही या वादात उडी घेतल्याची चर्चा रंगलू लागली आहे.
“आधी कलम ३९ (अ) चा मुद्दा समोर आला, आता त्याचे साइड इफेक्ट्स समोर आले,” असे सूचक वक्तव्य वीरेश बोरकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केले. या पोस्टमागे नेमका कोणता संदर्भ आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट भाष्य केले नसले तरी पक्षातील सुरू असलेल्या अंतर्गत वादाशी त्याचा संबंध जोडला जात आहे.
आरजी पक्षात गेल्या काही दिवसांपासून धोरणात्मक निर्णय, नेतृत्वशैली आणि काही संवेदनशील मुद्द्यांवरून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच बोरकर यांच्या या पोस्टमुळे पक्षातील नाराजी आणि अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या पोस्टवर पक्षातील इतर नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून; आगामी काळात आरजीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.