बुलढाण्यातील लग्नमंडपात पसरली शोककळा

बुलढाणा: लग्नमंडपात आनंदाचे वातावरण होते. "लेक लाडकी या घरची..." असे गीत गायले जात होते. सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, मंगलाष्टकांचा नाद आणि डीजेच्या दणदणाटात वरदडी गाव (ता. सिंदखेड राजा) एका विवाह सोहळ्याच्या उत्सवात न्हाऊन निघाले होते. मात्र, नियतीने याच आनंदावर असा काही घाला घातला की, क्षणार्धात लग्नाचा मांडव शोकाकुल झाला. आपल्या काळजाच्या तुकड्याचे, लेकीचे कन्यादान करत असतानाच कुरुमदास कुंडलिक भुतेकर (५०) या पित्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
कुरुमदास भुतेकर यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील प्रदीप नानोटे यांच्याशी बुधवारी, १३ मे रोजी ठरला होता. लग्नाचे सर्व विधी उत्साहात पार पडले. हळद लागली, सगेसोयरे जमले आणि बुधवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर मंगलाष्टकेही झाली. अक्षता पडल्या आणि सर्वजण आनंदाने नवरी-नवरदेवाचे अभिनंदन करत होते. त्यानंतर विधीनुसार कन्यादानाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. कुरुमदास आपल्या लेकीचा हात वराच्या हाती सोपवत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते लग्नमंडपातच कोसळले.
उपस्थितांनी तातडीने कुरुमदास यांना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कुरुमदास यांची गेल्या डिसेंबरमध्येच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तरीही आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटात व्हावे, यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून धावपळ करत होते. आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे होते, सगळी तयारी केली, विधी पार पडल्या, पण देवाने आमच्यावर मोठा अन्याय केला, अशा भावना त्यांचे पुतणे कैलास भुतेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
एकीकडे नंदिनीच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती, पण त्याच क्षणी तिच्या डोक्यावरचा मायेचा हात कायमचा निघून गेला. लग्नाचा जल्लोष काही मिनिटांतच शोकसभेत बदलला. ज्या बापाने आपल्या लेकीला लहानाचं मोठे केले, तिच्या सुखासाठी रात्रंदिवस कष्ट उपसले, त्याच बापाला लेकीच्या पाठवणीचे दृश्य पाहायला नशिबाने साथ दिली नाही. आज वरदडी गावात केवळ स्मशानशांतता असून, कुरुमदास यांच्या जाण्याने एक कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा सुन्न झाला असून, सोशल मीडियावर या पित्यासाठी हळहळ व्यक्त होत आहे.