
मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली असताना भारताचा जुना मित्र रशियाने मोठा दिलासा दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव (Sergey Lavrov) यांनी भारताच्या ऊर्जा गरजांवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत तेल, गॅस आणि कोळसा पुरवठा अखंड सुरू ठेवण्याची हमी दिली.
लावरोव यांनी सांगितले की, रशिया (Russia) भारताशी (India) केलेल्या ऊर्जा करारांचे पूर्ण पालन करेल आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावामुळे किंवा अन्यायकारक स्पर्धेमुळे भारताच्या हितसंबंधांना धक्का बसू दिला जाणार नाही. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताची ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी रशिया कटी बद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कुंदनकुलम अणुऊर्जा प्लांट भारत-रशिया सहकार्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
तामिळनाडूमधील कुंदनकुलम अणुऊर्जा प्लांट (Kudankulam Nuclear Power Plant) हा भारत-रशिया सहकार्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याचे सांगत लावरोव यांनी या प्रकल्पातील नव्या युनिट्सच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याचे नमूद केले. २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
भारत-रशिया (India-Russia) संबंधांविषयी बोलताना लावरोव यांनी पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) यांचे कौतुक केले. भारताची आर्थिक, तांत्रिक, सांस्कृतिक आणि संरक्षण क्षेत्रातील स्वायत्तता मजबूत करण्यासाठी मोदी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. भारत आणि रशियामधील संबंध हे हे केवळ रणनीतिक नसून दीर्घकालीन विश्वास आणि मैत्रीवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘हिंदी-रूसी भाई भाई’
‘हिंदी-रूसी भाई भाई’ हा नारा दोन्ही देशांतील सांस्कृतिक जिव्हाळ्याचे प्रतीक असल्याचे सांगताना लावरोव यांनी अभिनेते (Raj Kapoor) यांच्या चित्रपटांची लोकप्रियता आजही रशियात कायम असल्याचे नमूद केले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा
दरम्यान, भारत दौऱ्यादरम्यान लावरोव हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार असून, ब्रिक्स (BRICS) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. या चर्चांमध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती, ऊर्जा सहकार्य, व्यापार, विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान तसेच संयुक्त राष्ट्रे, ब्रिक्स (United Nations, BRICS) आणि जी२० (G20) अंतर्गत सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.