'वॉर' अँड 'पीस' ! आमदार विरेश बोरकरांच्या समर्थकांना परबांनी संबोधले 'भाड्याचे बैल'

'सायलंट कावर्ड' हॅशटॅग वापरत मनोज परब यांनी बोरकरांवर देखील निशाणा साधला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
42 mins ago
'वॉर' अँड 'पीस' ! आमदार विरेश बोरकरांच्या समर्थकांना परबांनी संबोधले 'भाड्याचे बैल'

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) सुरू असलेला अंतर्गत कलह आता वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचला असून, पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी आमदार विरेश बोरकर यांच्यावर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. आपल्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना परब यांनी विरेश बोरकर यांचे ‘भाड्याचे बैल’ संबोधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षातील मतभेद मिटण्याऐवजी ३९ (अ) आंदोलनानंतर ते अधिक तीव्र झाले असून, आता दोन्ही नेत्यांमधील संवाद पूर्णपणे तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.



या वादाची ठिणगी सोशल मीडियावरील पोस्टमुळे अधिक भडकली. आमदार विरेश बोरकर यांनी काल रात्री उशिरा 'पीस' (शांतता) असे म्हणत संयम राखण्याचे आवाहन करणारी पोस्ट केली होती. मात्र, आज सकाळी मनोज परब यांनी त्यावर खोचक उत्तर दिले. परब यांनी 'वाटाणा' आणि 'पीस' अशा शब्दांचा खेळ करत एक इमोजी पोस्ट केला आणि खाली 'सायलंट कावर्ड मॅ्युरिटी' (#silentcowardmaturity) असा हॅशटॅग वापरून बोरकर यांच्यावर नामोल्लेख टाळून भ्याडपणाचा आरोप केला. थोडक्यात विरेशच्या शांततेच्या आवाहनाला मनोजने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या का ? असाही तर्क सोशल मीडियावर अनेकांकडून लढवला जात आहे. 




पक्षातील हे दोन गट आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. मनोज परब यांच्या पाठीशी केंद्रीय कार्यकारिणी, सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारी उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला आमदार विरेश बोरकर यांना सांत आंद्रे मतदारसंघातील तृप्ती बकाल, लिसियो रोन्कोन आणि डॅगली फर्नांडिस यांसारख्या स्थानिक नेत्यांसह युनायटेड किंगडममधील (UK) कट्टर समर्थकांचा पाठिंबा मिळत आहे. मध्यस्थीचे अनेक प्रयत्न होऊनही दोन्ही बाजू झुकण्यास तयार नसल्याने पक्षाची ताकद विभागली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वैयक्तिक पातळीवरील या आरोप-प्रत्यारोपामुळे गोव्यातील एका उगवत्या राजकीय शक्तीसमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

हेही वाचा