आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची सत्तरीतील ‘त्या’ मुलाला २५ लाखांची आर्थ‌िक मदत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची सत्तरीतील ‘त्या’ मुलाला २५ लाखांची आर्थ‌िक मदत

पणजी: वाळपईच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये (Valpoi Community Health Center) झालेल्या कथित वैद्यकीय निष्काळजीपुणामुळे आपल्या पायांची हालचाल गमावलेल्या सत्तरीच्या ११ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबियांना; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane)  यांनी आपल्या वैयक्तीक ट्रस्टच्या वतीने २५ लाख रुपयांची आर्थ‌िक मदत जाहीर केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना राणे यांनी या घटनेला दुर्दैवी असे म्हटले आणि यापुढे अशी घटना होऊ नये म्हणून सरकारने सर्व सरकारी इस्पीतळांमध्ये तपासणी करण्यासाठी आणि इतर कठोर वैद्यकीय नियम तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे; असे सांगितले.

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मुलाला आपला पाय गमवावा लागला, हे दुर्दैवी आहे, असे राणे यांनी सांगितले. स्थापन केलेल्या समितीत आरोग्य सचिव, आरोग्य सेवा संचालक, आरोग्य विभागाचे सल्लागार फ्रेझेला अरौजो आणि इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे. सरकारी आरोग्य सुविधांमध्ये प्रक्रियांचा आढावा घेणे आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची जबाबदारी या समितीला दिली आहे.   

आम्ही झालेले नुकसान भरून काढू शकत नाहीत, पण अशी घटना पुन्हा होऊ नये, याची आम्ही खात्री करू शकतात, असे राणे यांनी भरपाई जाहीर करताना सांगितले. 

२७ एप्रिलला पडल्याने डाव्या पायाला दुखापत झाल्यानंतर त्याला वाळपईच्या कम्युनिटी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. चौकशी अहवालानुसार, ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे  यांनी त्याची तपासणी केली होती. 

नंतर त्याला उलटी आणि ग्लानी येण्याची लक्षणे दिसू लागल्याने, पुन्हा कॅज्युअल्टी विभागात आणण्यात आले. तेथून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. पुढे त्याच्या पायांच्या बोटांना सूज आल्याने आणि प्लास्टरमध्ये गॅंग्रीन झाल्याने त्याचा पाय कापावा लागला. चौकशी अहवालात नमूद केलेल्या निष्काळजीपणाला जबाबदार धरून गोवा सरकारने डॉ. यवंती गावडे  यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा