गोव्यात सोने-चांदीच्या दरात वाढ; खरेदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया

सोन्याच्या एका तोळ्यामागे १० हजार, तर चांदीमध्ये १३ हजारांची विक्रमी वाढ.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
गोव्यात सोने-चांदीच्या दरात वाढ; खरेदीबाबत संमिश्र प्रतिक्रिया

पणजी : केंद्र सरकारने बुधवारपासून सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ केली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर अवघ्या काही तासांत राज्यासह देशभरातील सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

एका तोळ्यामागे सोन्याच्या दरात कॅरेटनुसार ८ ते १० हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात प्रति किलो ११ ते १३ हजार रुपयांची वाढ झाली. दरवाढीमुळे गुंतवणूक म्हणून होणारी सोने-चांदीची खरेदी घटण्याची शक्यता असली तरी, लग्न आणि सणासुदीसाठीची खरेदी कायम राहील, असा विश्वास काही स्थानिक सराफांनी व्यक्त केला आहे. तर काहींनी सोन्याच्या विक्रीवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे समीर कुडतरकर म्हणाले की, आयात शुल्कात वाढ झाल्याने राज्यातील सोन्या-चांदीचे दर अचानक वधारले आहेत. असे असले तरी अद्याप जीएसटी (GST) दर कायम आहेत. गोव्यामध्ये प्रामुख्याने लग्न किंवा सणांसाठी सोने खरेदी केले जाते. त्यामुळे या कारणांसाठी गोमंतकीय सोने नक्कीच खरेदी करतील. मात्र, भविष्यात गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटे किंवा 'बुलियन' पद्धतीचे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले असले तरी, गोव्यात या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जर सोने खरेदी कमी झाली, तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. स्थानिक सराफांनी या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली असल्याने सरकाराने आमचाही विचार करावा. गुंतवणूक करण्यापेक्षा आवश्यकतेनुसारच सोने खरेदी करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.


अन्य एका सराफ व्यापाऱ्याने सांगितले की, दरवाढीमुळे ग्राहकांची संख्या रोडावून व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. गोव्यात लग्नसराईत सरासरी १० तोळे सोने खरेदी केले जाते, ज्याचे प्रमाण आता कमी होऊ शकते. काही ग्राहक जुने सोने देऊन त्या बदल्यात नवीन दागिने घेतात; यामध्ये सोने आयात करण्याची गरज नसते, त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये करात सूट देण्याचा विचार सरकारने करावा. सणासुदीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही विविध सवलती देण्याचा विचार करत आहोत.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

समीर कुडतरकर यांनी सांगितले की, आयात शुल्क वाढीनंतर सोन्याच्या खरेदीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिणार आहोत. यामध्ये आमच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या जातील.

हेही वाचा