डिचोली पोलिसांनी ११ जणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

डिचोली : लोढा प्रकल्प (Lodha Project) प्रकरणावरून कारापूर-सर्वण पंचायतीच्या (Karapur-Sarvan) कार्यवाहक सरपंच व उपसरपंचांना पंचायत कार्यालयात रोखून धरल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्या जमावाकडून १२ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कारापूर-सर्वण पंचायत कार्यालयातील पंचायत सचिवांच्या दालनात हा प्रकार घडला. सर्वण येथे सुरू असलेल्या लोढा प्रकल्पाला ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याची मागणी करीत संतप्त गावकरी ग्रामपंचायत कार्यालयात घुसले.
कार्यवाहक सरपंच (Sarpanch) व उपसरपंच यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव केला. आक्रमक होऊन तक्रारदारांकडे धाव घेतली. तसेच त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून रोखले. लोढा प्रकल्पाविरोधात ‘कारणे दाखवा’ नोटीसीवर सही करावी किंवा पदाचा राजीनामा द्यावा, असा दबाव टाकण्यात आल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी स्वतंत्रपणे अशा नोटिशीवर सही करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत, उपसंचालक, पंचायत कार्यालयाशी चर्चा करून कायदेशीर सल्ल्यानुसार पुढील कारवाई करू, असे वारंवार स्पष्ट केले. मात्र, जमावाने कोणतेही स्पष्टीकरण न ऐकता त्यांना रोखून धरल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
फिर्यादीत सिद्धेश तारी व अब्दुल रहीम मुल्ला यांनी जमावाला चिथावणी दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. जमावाने धमकीचे वातावरण निर्माण करून ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज विस्कळीत केले. तसेच तक्रादारांना मानसिक त्रास दिल्याचा व भीती निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १९१(२), १२७ (२), १३२ सह १९० अन्वये ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विराज धौसकर करीत आहेत.