
मडगाव : वेर्णाहून लोटलीकडे जाणार्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मिर्झापुर, उत्तरप्रदेश येथील ३० वर्षीय तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला. मायणा-कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत संशयित गाडीचालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील ३० वर्षीय प्रमोद निषाद हा तरुण कामाच्या निमित्ताने गोव्यात आलेला होता. दोन दिवसांपासून तो कामाच्या निमित्ताने फिरत होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह वेर्णा-लोटली मार्गावर आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रस्त्याच्या बाजूने चालत असताना अज्ञात वाहनाने निषाद याला धडक दिली व पलायन केले. अपघातात जखमी निषाद याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. निषाद हा दोन दिवसांपूर्वी नोकरीच्या शोधात गोव्यात आलेला होता पण अपघातात त्याला जीव गमवावा लागल्याची माहितीही मिळत आहे.
मायणा-कुडतरी पोलिसांनी अपघाताची नोंद केलेली आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी (Maina-Curtorim Police) या अपघातप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) व इतर पुराव्यांच्या आधारावर संशयित गाडी चालकाला शिरोडा येथे गाडीसह ताब्यात घेतले.
मायणा-कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालक विजय श्रेष्ठ (५१ वर्षे, रा. मुंबई) याला अटक केलेली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या (South Goa District Hospital) शवागारात ठेवण्यात आलेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशुतोष नाईक पुढील तपास करत आहेत.