बार्देश : उघड्यावर कचरा फेकला, तर फोटो थेट सोशल मीडियावर

नास्नोळा पंचायतीची ‘नेम अँड शेम’ मोहीम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
बार्देश : उघड्यावर कचरा फेकला, तर फोटो थेट सोशल मीडियावर

म्हापसा : नास्नोळा (Nachinola) येथील वीज उपकेंद्राजवळ गावार येथे रस्त्याच्या कडेला कचरा (garbage) टाकून परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई म्हणून नेम अँड शेम (नाव जाहीर करून लज्जित करणे) धोरण अवलंबवण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. या ठिकाणी कचरा टाकताना जो सापडेल, त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर (photograph will publish on social media) प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती आमदार अॅड. कार्लुस फेरेरा (Ad. Carlos Ferreira) यांनी दिली.

हळदोणा आणि नास्नोळा पंचायतीच्या सीमाभागात येणाऱ्या या जागेची आमदार अॅड. फेरेरा, नास्नोळाचे सरपंच नीलेश केरकर, पंचायत मंडळ, ग्रामस्थ व पर्यावरण कार्यकर्त्यांनी पाहणी केली. रहिवाशांनी याबाबत तक्रार केली होती.

आमदार अॅड. फेरेरा यांनी यांनी या उघड्यावर कचरा टाकण्याविषयीच्या लोकांच्या मानसिकतेचा तीव्र निषेध केला. कुजलेल्या या कचऱ्यामुळे पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती आहे. इथे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही समाजकंटकांनी खराब केले आहेत. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण कार्यकर्त्या नताशा पारेख यांनी गटारांमधील कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याकडे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय आणि मिश्र कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होणारे मार्ग आधीच तुंबले आहेत. पावसाळ्यात हा कचरा तलाव, शेती आणि जवळच्या गावांमध्ये वाहून जाईल, ज्यामुळे जलस्रोत प्रदूषित होतील, असे त्या म्हणाल्या.
पंचायतीच्या ग्राम विकास समितीचे सदस्य देविदास नेतार्डेकर म्हणाले की, प्रत्येक पंचायतीमध्ये कचरा संकलन यंत्रणा आहेत. तिथे हा कचरा द्यावा. अशा प्रकारे निर्जन जागांचा गैरवापर करू नका.

संबंधित जागा तातडीने स्वच्छ करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाशी संपर्क साधला असून पावसाळ्यापूर्वी अंतर्गत भागांचीही स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन आमदारांनी दिले.

हळदोणा, डिचोली, मये व इतर भागांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी लोक कचरा टाकतात. पंचायतीकडून वेळोवेळी हा परिसर स्वच्छ केला जातो. परंतु पुन्हा कचरा टाकला जात असल्याने समस्या कायम आहे. लोकांनी उघड्यावर कचरा न टाकता कचरा संकलन करणाऱ्यांकडे द्यावा.
- नीलेश (लक्ष्मण) केरकर, सरपंच    

हेही वाचा