देशभरातील ७०९ युवा शटलर्स गोव्यात होणार दाखल

पणजी : गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आलेली प्रतिष्ठित ‘योनेक्स-सनराईज अखिल भारतीय उप-कनिष्ठ (१३ वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धा २०२६’ ही राष्ट्रीय मानांकन स्पर्धा १३ ते १८ मेदरम्यान मनोहर पर्रीकर इंडोअर स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ७०९ उदयोन्मुख युवा बॅडमिंटनपटू सहभागी होणार असून गोव्यातील क्रीडारसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेचे सहआयोजन साऊथ गोवा डिस्ट्रीक्ट बॅडमिंटन असोसिएशन करत असून ‘मॉडेल मडगाव’ या उपक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेला पाठबळ देण्यात आले आहे. हा उपक्रम योगीराज दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
स्पर्धेतील पात्रता सामने १३ आणि १४ मे रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू होणार आहेत. त्यानंतर मुख्य फेरीतील सामने १५ ते १८ मेदरम्यान खेळवले जाणार आहेत. मुलांच्या आणि मुलींच्या १३ वर्षांखालील एकेरी तसेच दुहेरी गटातील सामने या स्पर्धेत होणार आहेत.
स्पर्धेचे आयोजन सचिव विनायक कामत यांनी केले असून, तामिळनाडूचे डी. दिनेश हे स्पर्धेचे रेफरी म्हणून काम पाहणार आहेत. केरळचे जी. प्रशांत हे मॅच कंट्रोलरची जबाबदारी सांभाळणार असून देशभरातील सुमारे ६० अधिकाऱ्यांचा सहभाग स्पर्धेच्या व्यवस्थापनासाठी असणार आहे.
देशातील अव्वल युवा खेळाडूंचा सहभाग
या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत भारतातील अनेक उदयोन्मुख बॅडमिंटनपटू विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. मुलांच्या एकेरी गटात रेहान दुडेकुला, सार्थक जोशी, हर्षित वेंकट साई आणि सिबी जेरो जे हे अव्वल मानांकित खेळाडू आकर्षण ठरणार आहेत. तर मुलींच्या एकेरी प्रकारात ल्योशा कोरुकोंडा, शन्वी रेड्डी निम्मा, अन्वी रेड्डी गाडे आणि हेझल जोशी यांच्याकडे विशेष लक्ष लागले आहे. दुहेरी गटात राजस्थानचे लोकेश गुर्जर आणि रक्षित सिंग मेहरा ही जोडी मुलांच्या गटात अव्वल मानांकित आहे, तर तेलंगणाच्या ल्योशा कोरुकोंडा आणि शन्वी रेड्डी निम्मा या जोडीकडे मुलींच्या दुहेरी गटात प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
मनोज पाटील यांनी सांगितले की, अशा राष्ट्रीय स्तरावरील मानांकन स्पर्धांमुळे गोव्यातील बॅडमिंटनला मोठी चालना मिळते. स्थानिक खेळाडूंना देशातील सर्वोत्तम युवा प्रतिभांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे हे त्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच गोवा सरकारच्या क्रीडा विकास धोरणाशी सुसंगतपणे गोव्याची देशातील प्रमुख क्रीडा केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटनेचे सचिव प्रवीण शेणॉय यांनी दक्षिण गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याचे कौतुक करत स्पर्धेच्या व्यावसायिक आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
गोव्याच्या खेळाडूंवर स्थानिकांची नजर
यजमान गोव्याकडून मायकेल रायन मरे, प्रतीक नाईक बोरकर, अयान्श सांके, वेध लोटलीकर आणि वरुण सहकारी हे युवा खेळाडू मुलांच्या गटात आव्हान उभे करणार आहेत. मुलींच्या गटात गोव्याची उदयोन्मुख स्टार अमायरा धुमटकर हिच्याकडे विशेष लक्ष असेल. गेल्या वर्षी राष्ट्रीय ११ वर्षांखालील स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या अमायराकडून यंदाही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिच्यासोबत कनिका पै वेर्णेकर, अश्बाह तहसीलदार आणि अदिती धारगळकर या खेळाडू गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.