आयपीएलमध्ये आता ‘गर्लफ्रेंड कल्चर’ला चाप

बीसीसीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 11:49 pm
आयपीएलमध्ये आता ‘गर्लफ्रेंड कल्चर’ला चाप

मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वर्तणुकीमुळे आणि ‘गर्लफ्रेंड कल्चर’मुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कमालीचे संतप्त झाले आहे. खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तिक आयुष्यातील प्रदर्शनावर अधिक भर दिल्याने, आगामी हंगामापासून खेळाडूंच्या मैत्रिणींना (गर्लफ्रेंड्स) प्रवासात आणि मुक्कामात सोबत ठेवण्यावर कडक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स या संघाच्या अधिकृत बसमधून प्रवास करत असून खेळाडूंसोबत एकाच हॉटेलमध्ये राहत आहेत. यामुळे संघाची रणनीती, ड्रेसिंग रूममधील चर्चा आणि अंतर्गत माहिती लीक होण्याचा धोका बीसीसीआयला वाटत आहे. एखादा मोठा वाद उफाळून येण्यापूर्वीच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्ड नवीन नियमांचा मसुदा तयार करत आहे.
बीसीसीआयच्या चिंतेचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे काही खेळाडूंच्या मैत्रिणी या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आहेत. यातील काहींनी यापूर्वी सट्टेबाजीशी (बेटिंग) संबंधित वेबसाइट्सचा प्रचार केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, काही वेळा या मैत्रिणींची वाट पाहिल्यामुळे संघाच्या बसला उशीर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे संघाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांसारख्या स्टार खेळाडूंना अनेकदा त्यांच्या कथित गर्लफ्रेंड्ससोबत पाहिले गेले आहे. आयपीएल २०२६ मध्ये शिस्तीचे अनेक प्रश्न आधीच निर्माण झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचे मीडिया मॅनेजर रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने आणि कर्णधार रियान परागने ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढल्याने त्यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली आहे.
बैठकीत होणार अंतिम निर्णय
बीसीसीआयच्या आगामी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यांबाबत जसे कठोर नियम आहेत (कुटुंबीय केवळ ठराविक कालावधीसाठीच सोबत राहू शकतात), तसेच किंवा त्याहून कडक नियम आयपीएलसाठी लागू केले जाऊ शकतात. यामुळे आता खेळाडूंच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार असल्याचे चिन्हे आहेत.