कारच्या स्वयंअपघातात गंभीर जखमी शिवम कोलवेकरचा उपचारादरम्यान मृत्यू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
कारच्या स्वयंअपघातात गंभीर जखमी शिवम कोलवेकरचा उपचारादरम्यान मृत्यू

धारबांदोडा : जुने गोवा ते पणजी कदंब बसस्थानक बगल रस्त्यावर सोमवारी झालेल्या कारच्या स्वयंअपघातात गंभीर जखमी झालेल्या कुळे येथील शिवम सुरेश कोलवेकर (२७) याचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले.

कुळे येथील वृत्तपत्र विक्रेते सुरेश कोलवेकर यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी बीएससी अॅग्रीपर्यंत शिक्षण घेतले होते. सध्या ते फोंड्याच्या दादा वैद्य विद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत होते.

सोमवारी कुळे येथून म्हापसा येथे जाताना जुने गोवा येथे स्वयंअपघात झाला होता. शिवम कोलवेकर अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

सुकन्या साळुंके यांनी जपली माणुसकी

धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य रुपेश देसाई यांच्या भगिनी सुकन्या सुनील साळुंके साखळी व्हाया जुने गोवामार्गे पणजी येथे निघाल्या होत्या. यावेळी गाडी थांबवून त्यांनी व त्यांच्या नागेश नामक चालकाने नागरिकांच्या सहाय्याने शिवमला कारमधून बाहेर काढून आपल्या कारने गोमेकॉत नेले.