२०२० मध्ये हणजूण येथे उधळली होती रेव्ह पार्टी

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २०२० मध्ये गाववाडी-हणजूण येथे एका व्हिलावर छापा टाकून तेथे सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली होती. या प्रकरणी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी (मुंबई) याच्यासह अॅना लिलिया नुकामेंदी, इवा इब्राहिम ओवा या विदेशी महिलेसह टोनी फर्नांडिस यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. तर, संशयित एलेना व्लादीमीर इमेलियेनोवा या महिलेची आरोपातून सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. विजया आंब्रे यांनी दिला.
गुन्हा शाखेने गुप्तहेरांच्या माहितीवरून गाववाडी - हणजूण येथील आश्रय डेव्हलपर्सच्या ‘फिरंगी पन्नी’ या व्हिलावर १६ आॅगस्ट २०२० रोजी छापा टाकला होता. त्यावेळी तिथे सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावत गुन्हा शाखेने २३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील संशयित कपिल झवेरी (४०, रा. कांदिवली, मुंबई) या बॉलिवूड अभिनेत्यासह एलेना व्लादीमीर इमेलियेनोवा, अॅना लिलिया नुकामेंदी आणि इवा इब्राहिम ओवा या तीन विदेशी महिलांना अमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्हा शाखेने ८ लाख ४६ हजार रुपये किमतीचे ४७.२ ग्रॅम चरस, ७६.२ ग्रॅम कोकेन, ९.९ ग्रॅम अॅक्टसी टॅबलेट्स, ३.२ ग्रॅम एमडीएमए अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच पथकाने २ लाख ४५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही जप्त केली होती. त्यानंतर गुन्हा शाखेने अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून वरील चारही संशयितांना अटक केली होती. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, त्यात पर्सेप्ट लाइव्हचे शैलेश शेट्टी याचा रेव्ह पार्टी आयोजित करण्यात सहभाग असल्यामुळे त्याला अटक केली. याच दरम्यान सत्र न्यायालयाने एलेना व्लादीमीर इमेलियेनोवा, अॅना लिलिया नुकामेंदी आणि इवा इब्राहिम ओवा यांना २२ आॅगस्ट २०२० रोजी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर शैलेश शेट्टीला सशर्त जामीन मंजूर केला. गुन्हा शाखेने यानंतर हे प्रकरण एएनसीकडे वर्ग केले. एएनसीने या प्रकरणी तपासपूर्ण करून आरोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणी झाली असता, एलेना व्लादीमीर इमेलियेनोवा हिच्यातर्फे अॅड. राजू पोवळेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, एलेना विरोधात पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने तिला आरोपातून मुक्त केले. तर न्यायालयाने कपिल झवेरी (मुंबई) याच्यासह अॅना लिलिया नुकामेंदी, इवा इब्राहिम ओवा, टोनी फर्नांडिस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.
पुरावा नसल्याने शैलेश शेट्टीला वगळले
एएनसीने या प्रकरणी तपासपूर्ण करून २०२४ मध्ये अभिनेता कपिल झवेरी (मुंबई) याच्यासह एलेना व्लादीमीर इमेलियेनोवा, अॅना लिलिया नुकामेंदी, इवा इब्राहिम ओवा आणि टोनी फर्नांडिस याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. मात्र, शैलेश शेट्टी याच्या विरोधात पुरावा नसल्यामुळे त्याला वगळण्यात आले होते.