लग्नाचे आमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक, अत्याचार

संशयिताला कोलवा पोलिसांकडून अटक, सहा दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 11:11 pm
लग्नाचे आमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक, अत्याचार

मडगाव : राजेंद्र सैनी (वय २८) याने महिलेशी इन्स्टाग्रामद्वारे मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने महिलेकडून सुमारे ४ लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने घेतले. याशिवाय लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलवा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजेंद्र सैनी या मूळ मथुरा उत्तरप्रदेशातील व्यक्तीने ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या काळात युवतीशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला होता. आपली खरी ओळख लपवून आणि खोटी माहिती देऊन त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. यानंतर वेळोवेळी लग्नाचे कारण पुढे करून त्याने पीडितेकडून सुमारे ४ लाख रुपये रोख, तसेच तिच्या दिवंगत आईची सोन्याची साखळी आणि अंगठीही घेतली. केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचारही केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने ‘बायलांचो एकवोट’ या सामाजिक संस्थेच्या मदतीने कोलवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तत्काळ संशयित राजेंद्र सैनी याला अटक केली. पोलिसांनी संशयिताविरोधात लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक शोषण करणे, विश्वासघात करत आर्थिक फसवणूक करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. संशयिताने आणखी कुणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश महाले पुढील तपास करीत आहेत.

न्यायासाठी सामाजिक संस्थेची मदत

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिला पूर्णपणे हादरून गेली. न्याय मिळवण्यासाठी तिने ‘बायलांचो एकवोट’ या सामाजिक संस्थेशी संपर्क साधत मदत मागितली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर देत संपूर्ण प्रकार समजून घेतला आणि तत्काळ कोलवा पोलीस ठाण्यात जाण्यास मदत केली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून कोलवा पोलिसांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित राजेंद्र सैनी याला अटक केली.