आसगावमध्ये आयपीएल बेटींगचा पर्दाफाश

सात जणांना अटक, ६ लाखांचे साहित्य जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 11:39 pm
आसगावमध्ये आयपीएल बेटींगचा पर्दाफाश

म्हापसा : आसगाव येथे एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये चालणार्‍या आयपीएल क्रिकेट बेटींगचा हणजूण पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी ७ जणांना अटक करत ८ मोबाईल फोनसह सहा लाखांचे साहित्य जप्त केले.

अटक केलेल्या संशयितांमध्ये निखील जेठानंद पोपतानी (रा. पुणे), विकी ब्रिजभम विश्वकर्मा (रा. उल्हासनगर, ठाणे), कमलेश भवनदास भखरू (रा. वडोदरा गुजरात), नवीन रतनलाल तलरेजा (रा. उल्हासनगर ठाणे), राहुल दिनेश शामदसानी (उल्हासनगर ठाणे), रोहीत महेशलाल कंजम (रा. उल्हासनगर ठाणे) व भरत धर्मेशभाई नमानी (वडोदरा गुजरात) यांचा समावेश आहे.

हणजूण पोलिसांनी ही कारवाई शनिवारी उत्तररात्री केली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर तसेच इतर ऑनलाईन सट्टेबाजीवर मोबाईलचा वापर करून पैजा स्वीकारताना संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

आसगाव येथील आसगाव रेसिडेन्सी इमारतीच्या ए ब्लॉकमधील फ्लॅटमध्ये इंडियन प्रिमियर लिग क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सदर फ्लॅटवर छापा टाकत ही कारवाई केली.

संशयितांकडून पोलिसांनी ८ मोबाईल फोन, एक टीव्ही संच आणि इतर साहित्य मिळून ६ लाखांच्या वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून वरील संशयित आरोपींना अटक केली.

पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली नीतेश शिंगाडी, हवालदार श्यामसुंदर पार्सेकर, कॉ. प्रकाश पोळेकर, गौरेश रेडकर, गुरुदास सांगेलकर व कल्पेश दाभोळकर या पथकाने ही कामगिरी केली.

फ्लॅट स्पर्धेच्या कालावधीपुरता भाडेपट्टीवर

आयपीएल क्रिकेटच्या २०२६ च्या स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात झाली. त्यापासून आसगावमध्ये हा सट्टेबाजीचा जुगार संशयित आरोपींनी वरील फ्लॅटमध्ये थाटला होता. यासाठी संशयितांनी हा फ्लॅट स्पर्धेच्या कालावधीपुरता भाडेपट्टीवर घेतला होता.